इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरु असलेले हल्ले आणि हमासच्या दहशतवाद्यांचं इस्रायलच्या नागरिकांना ठार करणं, ओलीस ठेवणं आणि पळवून नेणं हे सगळे प्रकार भयंकर आहेत. अशातच एका इस्रायली नागरिकाच्या पत्नीने ओलीस ठेवलं जाण्याआधी एक फोन तिच्या पतीला केला. त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावरही होते आहे.

काय होतं या फोन कॉलमध्ये?

दुरान अशेर असं या महिलेचं नाव आहे. ती आपल्या मुलींना घेऊन आजीकडे गेली होती. आजीचं घर गाझा सीमेवर आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीला फोन केला आणि सांगितलं, आता घरात दहशतवादी शिरले आहेत. तिचं ते वाक्य ऐकल्यानंतर तिच्याशी त्याने कुठलाही संपर्क झालेला नाही. दुरुन अशेर या महिलेने तिचा पती युनी अशेरला केलेला तो शेवटचा फोन ठरला आहे. आपल्या पत्नीचा फोन कुठे आहे हे युनी अशेरने गुगलवर ट्रॅक केलं असता गाझातल्या खान युनिस भागात तो असल्याचं त्याला कळलं आहे. रॉयटर्सने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

ही संपूर्ण घटना घडल्यानंतर युनी अशेरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पाहिला ज्यात त्याची मुलं आणि पत्नी यांना ओलीस ठेवून गाझामध्ये नेण्यात आलं. त्याने रॉयटर्सशी बोलताना सांगितलं की मी त्या बंधकांमध्ये पाहिलं माझी पत्नी होती. तिच्या भोवती हमासच्या दहशतवाद्यांचा गराडा होता. माझ्या दोन मुली ज्या जेमतेम ५ आणि ३ वर्षांच्या आहेत. आता पुढे काय होईल ते मला माहित नाही. मी आता माझी पत्नी आणि माझ्या दोन गोंडस मुलींसाठी फक्त प्रार्थनाच करु शकतो. त्यांना सोडण्याच्या बदल्यात मी ओलीस राहायला तयार आहे असंही युनी अशेरने सांगितलं आहे. मी हमासच्या दहशतवाद्यांपुढे हात जोडतो कृपा करुन माझ्या पत्नीला आणि मुलांना इजा पोहचवू नका. कुठल्याच महिलांना इजा पोहचवू नका. तुम्ही म्हणत असाल तर मी ओलीस राहण्यास तयार आहे.

हे पण वाचा- घरात घुसून दाम्पत्याची हत्या, मुलं झाली अनाथ; इस्रायलमधल्या युद्धाचा भेसूर चेहरा समोर

न्यू यॉर्करला दिलेल्या मुलाखतीत युनी अशेर म्हणाले की मी या सगळ्या प्रकारानंतर सरकारच्या प्रतिनिधींशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि माझ्या कुटुंबाला परत आणण्याची याचना करतो आहे. माझ्या परिने त्यांना सोडवण्यासाठी जे करायचं असेल ते करायला मी तयार आहे. सध्या मी प्रचंड तणाव सहन करतो आहे तसंच मला प्रचंड भीतीही वाटते आहे की माझ्या कुटुंबाचं काय झालं असेल? असंही अशेर यांनी म्हटलं आहे.