आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा सरकारकडून रोख रक्कम, सरकारी नोकरी, जमीन अशी बक्षीसे दिली जातात. आता या यादीत गायीचे नावदेखील जोडावे लागणार आहे. हरयाणाचे पशुसंवर्धन मंत्री ओम प्रकाश धनकर यांनी युवा महिला चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणाऱ्या राज्याच्या खेळाडूंना गाय बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे.
हरियाणा बॉक्सिंग असोसिएशनचे प्रमुख असलेल्या धनकर यांनी रोहतकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना दुधाचे फायदे सांगितले. ‘गायीच्या दूधात फॅटचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हे बॉक्सर्ससाठी फायदेशीर आहे. गायी कायम सक्रीय असतात. तर म्हशी बराच वेळा झोपेतच असतात,’ असे धनकर यांनी म्हटले. बॉक्सर्सनी जगात देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांना कायम अशीच कामगिरी करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या गायी देशी असतील, अशी माहिती त्यांनी दिली. या गायी दिवसाला १० लीटर दूध देतील, असेही ते म्हणाले. नीतू (४८ किलो वजनी गट), ज्योती गुलिया- (५१ किलो वजनी गट), साक्षी धंदा (५४ किलो वजनी गट), शशी चोपडा (५७ किलो वजनी गट), अनुपमा (८१ किलो वजनी गट), नेहा यादव (८१ किलो वजनी गट) यांनी युवा महिला चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी केली होती. या सर्व खेळाडूंच्या घरांचे पत्ते घेण्यात आले असून लवकरच त्यांच्या घरी गायी पोहोचवल्या जातील, असे धनकर यांनी सांगितले.
मंत्र्यांच्या या घोषणेमुळे खेळाडू आश्चर्यचकीत झाले आहेत. याबद्दल बोलताना, ‘मला आतापर्यंत अनेक बक्षीसे मिळाली. देवदेवतांच्या मूर्तीं, पुस्तके देऊन अनेकदा कामगिरीचे कौतुक झाले. मात्र कधीच गाय मिळाली नव्हती. मला गाय खूप आवडते. गेल्या वर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या साक्षी मलिकला चांदीची गाय देण्यात आली होती, असे मी वाचले होते. मात्र मला खरीखुरी गाय बक्षीस म्हणून मिळाली आहे,’ अशी प्रतिक्रिया नीतूने दिली.