कर्नाटकच्या उडुपीमध्ये बुरखा परिधान करण्यावरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. बुरखा किंवा हिजाब घालून महाविद्यालयात येणाऱ्या काही विद्यार्थिनींना कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. तिथून या प्रकरणाला सुरूवात झाली आहे. या प्रकरणाचं भीषण वास्तव समोर आणणारा एक व्हिडीओ महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला असून त्यावरून त्यांनी परखड टीका करणारा संदेश पोस्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचं पाकिस्तान!

जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ ट्वीट करताना कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या या वादावर टिप्पणी केली आहे. “जेव्हा एक मुस्लीम मुलगी पीईसी कॉलेजमध्ये आली, तेव्हा तिला अनेक विद्यार्थ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्यांनी भगव्या रंगाचं उपरणं अंगावर घेतल्याचं दिसतंय. हे तथाकथित भक्त भारताचा पाकिस्तान करून सोडणार आहेत. हे राम”, असं आव्हाड आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये?

जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी बुरखा घालून एका महाविद्यालयाच्या आवारात स्कूटीवर आल्याचं दिसत आहे. स्कूटी पार्क करून ही मुलगी महाविद्यालयात जात असताना काही विद्यार्थी भगव्या रंगाचं उपरणं हातात घेऊन ‘जय श्री राम’च्या घोषणा देताना दिसत आहेत. ही मुलगी पुढे कॉलेजच्या इमारतीमध्ये जाताना देखील ही मुलं मुलीच्या मागोमाग घोषणा देताना जात असल्याचं दिसत आहे. पुढे आल्यानंतर ही मुलगी देखील नंतर अल्ला हो अकबर अशा घोषणा देताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांनी हा व्हिडीओ ट्वीट करून टीका केली आहे.

वाद कोणत्या घटनेमुळे?

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.

लोकसत्ता विश्लेषण : गणवेश आणि धार्मिक स्वातंत्र्य : हिजाब मुद्द्यावरून उपस्थित काही प्रश्न

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला हा प्रकार उडुपी येथील सरकारी मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयात घडला. सहा विद्यार्थिनींनी ड्रेस कोडचे उल्लंघन करून हिजाब घालून वर्गात हजेरी लावली होती. महाविद्यालयाने वर्गाव्यतिरिक्त इतरत्र हिजाब घालण्याची परवानगी दिली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hijab wearing ban in karnataka udupi jitendra awhad slams shared video pmw