भारतात अॅपलला मोठी संधी असल्याचा पुनरुच्चार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी केला आहे. भारतात अॅपलला प्रचंड संधी असल्यानेच कंपनीकडून भारतावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचे कूक यांनी म्हटले. ‘कंपनीकडून भारतात मोठी गुंतवणूक केली जात आहे. विविध क्षेत्रात आणि विविध आघाड्यांवर कंपनीकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे,’ असे टिम कूक यांनी दुसऱ्या तिमाहीच्या उत्पन्नाबद्दलची माहिती देताना म्हटले.
भारतीय बाजारपेठेत अॅपलचा टक्का फार मोठा नसल्याचे टिम कूक यांनी मान्य केले. मात्र सध्या अॅपलची भारतात २० टक्के वेगाने वाढ होत असल्याचे टिम कूक यांनी सांगितले. ‘मागील तिमाहीत अॅपलने भारतात २० टक्के वाढ नोंदवली. यामुळे अॅपलच्या महसुलाने दोन अंकी टप्पा ओलांडला आहे. भारतीय बाजारपेठेतील स्थान बळकट करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. भारतातील अॅपलच्या वाढीबद्दल विश्वास वाटतो,’ असे टिम कूक म्हणाले. ‘भारतातील तरुणांची संख्या लक्षणीय आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे आणि देशातील ४जीचे जाळेदेखील विस्तारते आहे,’ असे यावेळी कूक यांनी म्हटले.
‘आमचा भारतीय बाजारपेठेतील वाढीचा दर चांगला आहे. लोकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करत आहोत. त्यामुळे आम्ही भारतावर लक्ष केंद्रीत केले असून भारतीय बाजारपेठेतील विस्ताराविषयी उत्सुक आहे,’ असे टिम कूक यांनी म्हटले. अॅपलकडून काही उत्पादनांची निर्मिती भारतात केली जाणार आहे. मात्र या उत्पादनांची घोषणा अद्याप अॅपलकडून करण्यात आलेली नाही. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अॅपलने बंगळुरुमध्ये पहिले डेव्हलपर सेंटर सुरु केले.