अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचं अंतरिम सरकार स्थापन झालं आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील देश आणि भिन्न विचारसरणी मानणाऱ्या राजसत्तांनी अपेक्षेप्रमाणेच भिन्न धोरण स्वीकारलं आहे. काहींनी तालिबान्यांच्या सरकारसोबत सहकार्याची भूमिका घेतली असून काहींनी तीव्र विरोध देखील केला आहे. याचवेळी भारतात गेल्या २० ते २५ वर्षांपासून फुटीरतावादी कारवाया करणाऱ्या हुर्रियत कॉन्फरन्सने तालिबान्यांच्या सरकारविषयी आणि अफगाणिस्तानमधील त्यांच्या सत्तेविषयी भूमिका मांडली आहे. याचवेळी हुर्रियतकडून तालिबानला इस्लामविषयी सल्ला देखील देण्यात आला आहे.
अफगाणिस्तानमध्ये शांततेची अपेक्षा!
हुर्रियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाचे प्रमुख मीरवेज उमर फारूक यांनी यासंदर्भात हुर्रियतची भूमिका स्पष्ट करताना तालिबान्यांना सल्ला दिला आहे. “अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार आल्यामुळे गेल्या ४० वर्षांपासून तिथे सुरू असलेल्या अस्थैर्य आणि अनिश्चिततेला आवर घातला जाईल. तालिबान्यांचं सरकार सर्वसमावेशक आणि व्यापक जनाधारावर स्थापित असेल आणि समानतेचा पुरस्कार करणारं असेल”, असं मीरवेज म्हणाले आहेत.
तालिबाननं हे लक्षात ठेवावं…
दरम्यान, शांतता आणि स्थैर्याची अपेक्षा ठेवताना मीरवेज उमर फारूक यांनी तालिबान्यांना सल्ला देखील दिला आहे. “तालिबान्यांनी हे ध्यानात ठेवावं की इस्लाम एक धर्म म्हणून निसंदिग्धपणे मानवी समता आणि हक्क, आर्थिक न्याय आणि धार्मिक सहिष्णुता या मूलभूत मूल्यांचा पुरस्कार करतो”, असं मीरवेज म्हणाले आहेत.
अफगाणिस्तान आणि काश्मीरची केली तुलना!
दरम्यान, मीरवेज फारूक यांनी यावेळी बोलताना अफगाणिस्तान आणि काश्मीरमधील जनतेची तुलना केली आहे. “हुर्रियतला हे माहिती आहे की दोन वादग्रस्त प्रदेशांमध्ये साम्य असू शकत नाही आणि अफगाणिस्तान-काश्मीर यांच्यामधली तफावत जगजाहीर आहे. पण तरीही, गेल्या ४० वर्षांपासून अफगाणिस्तानमधील जनता देखील एक प्रकारच्या अनिश्चिततेमध्ये जगत आहे, त्यामुळे काश्मीरमधील्या जनतेच्या सहवेदना त्यांच्यासोबत आहेत”, असं फारूक म्हणाले आहेत.