हैदराबाद उच्च न्यायालयाच्या एका न्यामुर्तींनी शुक्रवारी गायीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा मिळायला हवा, असे न्या. बी. शिवाशंकर राव यांनी म्हटले आहे. गाय ही भारताची पवित्र राष्ट्रीय वारस असल्याचे सांगत गाय ही आई आणि देवाच्या स्थानी आहे, असे म्हटले. काही दिवसांपूर्वीच राजस्थान उच्च न्यायालयानेही गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा देण्याबाबत म्हटले होते.
पशुपालक रामावत हनुमा यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमुर्तींनी हे वक्तव्य केले. रामावतने त्याची जप्त करण्यात आलेल्या ६३ गायी परत मिळवण्यासाठी कनिष्ठ न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, कनिष्ठ न्यायालयाने त्याचे अपील फेटाळले होते. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
गायींना चरण्यासाठी आपल्या गावाजवळील कंचनपल्ली या गावात नेले होते, असे रामावतने न्यायालयाला सांगितले होते. तर दुसरीकडे विरोधी पक्षाने रामावत हा गायी विकण्यासाठी घेऊन जात असल्याचा आरोप केला. बकरी ईद दरम्यान गोमांस विकण्याचा त्याचा इरादा होता, असे न्यायालयाला सांगितले होते.
न्या. बी. शिवाशंकर राव यांनी रामावत हनुमाचे अपिल रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला दिला. मुस्लिमांना बकरी ईदवेळी धडधाकड गायींना मारून त्यांचे मांस खाण्याचा कोणताही कायदेशीर अधिकारी नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीचा हवाला त्यांनी दिला. त्याचबरोबर त्यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील जनावरांच्या डॉक्टरांना इशारा दिला आहे. चांगल्या गायींना दूध देण्यास अकार्यक्षम ठरवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. गाय दूध देण्यास समर्थ नाही, असे डॉक्टरांनी प्रमाणपत्र दिल्यास त्या गायीला कत्तलखान्यात नेण्याची आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये परवानगी आहे.