IAS officer arrested : अरुणाचल प्रदेश पोलिसांनी सोमवारी राज्यातील एका आयएएस (IAS) अधिकाऱ्याला अटक केली आहे. गेल्या आठवड्यात मृत्यू झालेल्या एका १९ वर्षीय व्यक्तीच्या कथित सुसाईड नोटमध्ये या अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते, त्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.
आयएएस अधिकाऱ्याचे नाव तालो पोटोम (Talo Potom) असे असून ते एजीएमयूटी (AGMUT) केडरचे आयएएस अधिकारी आहेत आणि दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) विशेष सचिव म्हणून कार्यरत होते. पोटोम यांनी सोमवारी सकाळी ईटानगर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या वर्षी जूनमध्ये त्यांची दिल्ली येथे बदली झाली होती, त्याच्या आधी ते ईटानगरचे जिल्हाधिकारी होते.
पापुम पारेचे एसपी न्येलाम नेगा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटोम यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम २७१ आणि २७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ वर्षीय व्यक्तीने २३ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केल्याचा संशय आहे. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने सुसाईड नोट मागे ठेवल्या आहेत, ज्यामध्ये त्याने अधिकाऱ्यांवर त्याचे लैंगिक शोषण करणे, त्याला आर्थिक आश्वासने देणे आणि त्याची फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत. कुटुंबीयांनी असेही सांगितले की, त्याला एचआयव्हीची झाल्याचेही त्याने या नोटमध्ये लिहिले होते.
पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याच्या काही वेळ आधी या आएएस अधिकार्याने एक व्हिडीओ स्टेटमेंट जारी करत त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तीबरोबर कोणतेही वैयक्तिक संबंध नसल्याचा दावा केला आहे. मृत व्यक्तीची त्यांनी कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक केली होती. या व्हिडिओमध्ये पोटोम यांनी आरोप केला की, त्यांची दिल्ली येथे बदली झाल्यानंतर १९ वर्षीय व्यक्तीने त्यांना खंडणीशी संबंधित काही प्रकरणांमध्ये मदत मागण्यासाठी अनेकदा फोन केले, त्यानंतर त्यांनी त्याचा फोन नंबर ब्लॉक केला.
मृत व्यक्तीच्या कुटुंबाने पोलीसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर, अरुणाचल प्रदेशातील पापुम पारे जिल्ह्यामध्ये एफआयआर नोंदवण्यात आला, यानंतर पोलिसांनी तालो पोटोम यांच्याविरोधात लुकआउट सर्क्युलर जारी केले.
या किशोरवयीन मुलाच्या कथित सुसाईड नोटमध्ये आणखी एका अधिकार्याचे नाव घेण्यात आले होते, राज्याच्या ग्रामीण बांधकाम विभागातील हे एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर लिकवांग लोवांग यांनी देखील कथितपणे आत्महत्या केली. किशोरवयीन मुलाच्या मृत्यूनंतर या अधिकार्यानेही तिरप जिल्ह्यात कथित आत्महत्या केली, असे एसपी नेगा यांनी सांगितले.
एसपी म्हणाले की, “पोलिसांकडून ऑक्टोबर २४ पासून त्यांचा शोध घेतला जात होता, जेव्हा प्रकरण आमच्या लक्षात आणून देण्यात आले, यावेळी ते दिल्लीत पोस्टेड होते, २८ ऑक्टोबर रोजी त्याच्या मुलीचे लग्न होणार होते त्यामुळे ते अरुणाचल प्रदेश येते रजेवर होते. सोमवारी त्यांनी स्वतः ईटानगर पोलिसांसमोर आत्मसमर्पन केले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आज पोलीस स्टेशन आणि न्यायालयाच्या बाहेर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कोर्टाने त्यांना पोलीस कोठडीऐवजी न्यायिक कोठडी सुनावली. “
