|| चंद्रकांत पंडित
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी गुरुवारचा सामना महत्त्वाचा होता; परंतु पावसामुळे तो रद्द करण्यात आला, याचे दु:ख सर्व क्रिकेटरसिकांना आहे. भारताला जर विश्वचषक जिंकायचा असेल तर त्यासाठी सर्व सामने होणे गरजेचे आहे. सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना एका गुणावर समाधान मानावे लागले; परंतु हा सामना झाला असता आणि त्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला असता तर आपले काम अजून सोपे झाले असते. एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द झाला. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला.
वातावरणातील बदल हा महत्त्वाचा मुद्दा या विश्वचषकातील अडथळा बनत आहे; परंतु इंग्लंडसारख्या देशात वातावरणात होणारा बदल ही बाब नेहमीचीच आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या गोष्टीचा विचार करता विश्वचषकात आणखी एक दिवस राखीव ठेवणे गरजेचे होते. कारण पहिल्यांदाच विश्वचषकात असे झाले आहे की, एकही चेंडू न खेळता तीन सामने रद्द करावे लागले. हे केवळ भारताच्याच नाही तर कोणत्याही चांगल्या संघाच्या नशिबात आले तर त्या संघाचे नुकसानच होऊ शकते. दोन अपराजित संघ जेव्हा खेळतात, तेव्हा या सामन्यातील विजयी संघ गुणतालिकेत वरच्या स्थानावर पोहोचतो.
विश्वचषकातील सामने पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. तिकिटे, हॉटेल्सचे बुकिंग करतात. सामना रद्द झाल्यामुळे त्यांचे नुकसान होते. त्यासाठी ‘आयसीसी’ने एक दिवसाची सवलत ठेवणे गरजेचे होते. इंग्लंडमध्ये सध्या उन्हाळा चालू असला तरी सतत बदलत्या वातावरणाचा तडाखा विश्वचषकाला बसत आहे. त्यासाठी काही तरी तोडगा काढणे गरजेचे आहे. हे सामने जर दोन गटांमध्ये संघांना विभागून खेळले गेले असते तर सामन्यांची संख्या कमी झाली असती आणि याचा नक्कीच फरक पडला असता. हा विश्वचषक जर भारतात खेळला गेला असता तर जानेवारी ते मेपर्यंत पाऊस पडत नाही. त्यामुळे पावसामुळे सामने रद्द होण्याची शक्यता तशी कमीच असती. चार वर्षांनी जेव्हा विश्वचषक येतो, तेव्हा सर्व सामने झाले तरच विश्वचषकाला खरा अर्थ प्राप्त होऊ शकतो. पावसामुळे बऱ्याच संघांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे चांगले संघ या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतात. त्यासाठी ‘आयसीसी’ने तोडगा काढणे गरजेचे आहे.
भारताला तीन सामन्यांमध्ये पाच गुणांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे यानंतरचा प्रत्येक सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. जरी पुढील सामने हे कमकुवत संघांसोबत आहे, असे बोलले जात असले तरी क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यामध्ये डाव कधी बदलेल हे सांगू शकत नाही. अशा वेळी जर पुन्हा पाऊस पडला तर याचा फायदा कमकुवत संघांनादेखील होऊ शकतो.
पाकिस्तानची तयारी कमी
रविवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे प्रत्येक भारतीय हा भावनिकदृष्टय़ा पाहतो आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान सामना हा एखाद्या युद्धासारखा खेळला गेला आहे. दोन्हा संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असल्याने तेवढय़ाच जिद्दीने आणि आक्रमकतेने तो सामना खेळतील. सामना जिंकण्याची पात्रता दोन्ही संघांकडे आहे; परंतु भारताचे नियोजन हे चांगले आहे. त्याच रणनीतीने भारत खेळला तर तो पाकिस्तानला सहज नमवू शकेल. पाकिस्तान संघाबद्दल सांगायचे झालेच तर त्यांची विश्वचषकाची तयारी कमी वाटते. प्रत्येक खेळाडू हा त्याची वैयक्तिक खेळी खेळत असल्याने त्यांच्यातील एकता कमी दिसते.
शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या जागी लोकेश राहुल सलामीला खेळेल; परंतु चौथ्या स्थानावर कोणाला खेळवायचे, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. हवामान बदलाचादेखील यावर परिणाम होऊ शकतो. या सामन्यात पावसाने भारताला दगा देऊ नये. भारतीय संघ ज्या रणनीतीने दोन सामने खेळला, तीच पाकिस्तानविरुद्ध वापरावी लागेल. सुरुवातीचे गडी बाद करण्यासाठी मोहम्मद शमीचा फायदा होऊ शकतो; परंतु शमीला संघात घेताना भुवनेश्वर कुमारची आत्तापर्यंतची कामगिरीदेखील पाहावी. वातावरण आणि पावसाचे आव्हान पाहून प्रशिक्षक रवी शास्त्री योग्य ११ खेळाडूंची निवड करतील, अशी आशा आहे.