भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शतक ठोकले. या स्पर्धेतील हे रोहितचे पाचवे शतक ठरले. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेश या ४ संघांविरुद्ध त्याने शतक लगावले होते. मात्र आजच्या सामन्यात त्याने स्पर्धेतील पाचवे शतक ठोकले आणि एका विश्वचषक स्पर्धेत ५ शतके ठोकणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला.

त्याआधी भारताविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ५० षटकात ७ बाद २६४ धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली होती, पण अनुभवी अँजेलो मॅथ्यूजचे शतक (११३) आणि थिरिमनेचे अर्धशतक (५३) याच्या जोरावर श्रीलंकेने अडीचशे धावांचा टप्पा गाठला आणि भारताला २६५ धावांचे आव्हान दिले.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा पर्याय स्वीकारला. पण त्यांची सुरुवात खराब झाली. करुणरत्ने बाद झाल्यावर लगेचच कुशल परेरादेखील १८ धावांवर माघारी गेला. त्यानंतर कुशल मेंडिसदेखील केवळ ३ धावा करून माघारी परतला. जाडेजाने पहिल्याच षटकात त्याचा अडसर दूर केला. तर पुढील षटकात पांड्याने अविष्का फर्नांडोला झेलबाद केले.

अँजेलो मॅथ्यूज आणि थिरिमने या दोघांनी डाव सावरला. या दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण केली. पण त्यानंतर थिरिमनेला माघारी परतावे लागले. त्याने ६८ चेंडूत ५३ धावा केल्या. पण मॅथ्यूजने एक बाजू लावून धरली. अनुभवी अँजेलो मॅथ्यूज हा शतक ठोकून बाद झाला. त्याने केलेल्या खेळीमुळे श्रीलंकेला अडीचशे पर्यंत मजल मारता आली. मॅथ्यूजने १२८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकार लगावत ११३ धावा केल्या. बुमराहने ३ तर पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप आणि जाडेजा यांनी १-१ बळी टिपला.