वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारताचा हुकूमी एक्का असून यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत गरज असताना त्याने संघाला विकेट मिळवून दिल्या आहेत. अचूक टप्प्याबरोबर यॉर्कर चेंडू हे बुमराहच्या भात्यातील मुख्य अस्त्र आहे. काल बांगलादेशला नमवून भारत उपांत्यफेरीत दाखल झाला त्यामध्ये बुमराहचे महत्वपूर्ण योगदान आहे.

बांगलादेशचे आठ विकेट गेल्यानंतरही सामन्यामध्ये चुरस टिकून होती. बुमराहने महत्वाच्या क्षणी दोन भन्नाट यॉर्कर टाकून बांगलादेशचे शेपूट गुंडाळले. त्यामुळे भारताचा उपांत्यफेरीतील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला. बुमराहने या सामन्यात ५५ धावात चार विकेट घेतले. नव्या चेंडूने गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना वेसण घालण्याबरोबरच हाणामारीच्या षटकांमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यामध्ये बुमराह माहीर आहे.

बुमराहने आज जे कौशल्य आत्मसात केले आहे त्याचे श्रेय तो नेटमधल्या सरावाला देतो. मी नेटमध्ये सराव करतो त्यावेळी प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याच्या दृष्टीन तयारी करतो. नव्या चेंडूने गोलंदाजी असो किंवा हाणामारीच्या षटकांमधली गोलंदाजी. मी प्रत्येक परिस्थितीनुसार गोलंदाजीचा सराव करतो असे बुमराहने सांगितले. या तयारीची सामन्यामध्ये मला मोठी मदत होते. तयारी चांगली असेल तर सामन्यात अंमलबजावणी करणे सोपे होते असे बुमराहने सांगितले. बुमराहने या वर्ल्डकपमध्ये ४.६ च्या सरासरीने सात सामन्यात १४ विकेट काढल्या आहेत. त्याने महत्वाच्या क्षणी आपल्या यॉर्कर चेंडूंचा प्रभावी वापर केला आहे.