पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशला ९५ धावांनी धूळ चारली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने ३१५ धावा केल्या. पण नेट रन रेटच्या समीकरणानुसार पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी बांगलादेशच्या संघाला ८ किंवा त्यापेक्षा कमी धावांवर रोखायचे होते. ते मात्र त्यांना शक्य झाले नाही. विंडीजविरुद्धच्या सामन्यात पाकचा संघ झटपट बाद झाला होता. त्यामुळे तब्ब्ल ३६ षटकांचा खेळ पाकिस्तनाच्या हातून निसटला होता. परिणामी शेवटच्या सामन्याआधी त्यांच्यापुढे अशक्यप्राय असे समीकरण ठेवण्यात आले.
सामना जिंकूनही पाकला स्पर्धेतील आपला गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर पाकचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी नेट रन रेटच्या समीकरणावर नाराजी व्यक्त केली. “ICC कडे माझी विनंती आहे की नेट रन रेटच्या गणिताच्या वेळी दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यांचा इतिहास तपासून पाहावा. कारण आम्ही विंडीजविरुद्धच्या सामन्यात वाईट कामगिरी केली, पण त्यानंतर आम्ही कामगिरीत प्रचंड सुधारणा केली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात आम्ही सामना थोडक्यात गमावला. पण या २ पराभवांमुळे आमच्या उर्वरित सामन्यांच्या कामगिरीचा परिणाम देखील शून्य ठरला”, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.
“नेट रन रेटच्या प्रणालीमुळे पाकिस्तनाच्या संघाचे कंबरडे मोडले. पहिला सामना पाकने वाईट पद्धतीने गमावला, त्यानंतर पूर्ण स्पर्धेत पाकला त्या प्रभावातून सावरणे शक्य झाले नाही. परिणामी बांगलादेशविरुद्ध सामना जिंकूनही दरसिंग रूममध्ये कोणी कोणाचे अभिनंदन केले नाही. त्यामुळे अशा प्रणालीबाबत पुनर्विचार व्हायला हवा”, असे मत आर्थर यांनी मांडले.
दरम्यान, पाक उपांत्य फेरीच्या स्पर्धेतून बाहेर गेल्याने न्यूझीलंडला उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले.
