भारताविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ५० षटकात ७ बाद २६४ धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली होती, पण अनुभवी अँजेलो मॅथ्यूजचे शतक (११३) आणि थिरिमनेचे अर्धशतक (५३) याच्या जोरावर श्रीलंकेने अडीचशे धावांचा टप्पा गाठला आणि भारताला २६५ धावांचे आव्हान दिले.

बुमराहने भेदक मारा करत श्रीलंकेचा पहिला गडी बाद केला. या बळीसह त्याने १०० एकदिवसीय बळी पूर्ण केले. त्यानंतरही बुमराहने आपला भेदक मारा सुरूच ठेवला. कुशल परेरा अत्यंत प्रतिभावान खेळाडू असल्याचे माहिती असल्याने बुमराहने त्याला स्विंग गोलंदाजी करून बाद केले. बुमराहने टाकलेला चेंडू इतका उत्तमरित्या स्विंग झाला की कुशल परेरा स्वतःच अवाक झाला. त्याला काहीही कळायच्या आधीच बॅटची कड लागून चेंडू  धोनीकडे गेला. धोनीने शांतपणे झेल टिपला आणि परेराला माघारी पाठवून दिले.

पहा व्हिडीओ –

दरम्यान, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा पर्याय स्वीकारला. पण त्यांची सुरुवात खराब झाली. करुणरत्ने बाद झाल्यावर लगेचच कुशल परेरादेखील १८ धावांवर माघारी गेला. त्यानंतर कुशल मेंडिसदेखील केवळ ३ धावा करून माघारी परतला. जाडेजाने पहिल्याच षटकात त्याचा अडसर दूर केला. तर पुढील षटकात पांड्याने अविष्का फर्नांडोला झेलबाद केले.

अँजेलो मॅथ्यूज आणि थिरिमने या दोघांनी डाव सावरला. या दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण केली. पण त्यानंतर थिरिमनेला माघारी परतावे लागले. त्याने ६८ चेंडूत ५३ धावा केल्या. पण मॅथ्यूजने एक बाजू लावून धरली. अनुभवी अँजेलो मॅथ्यूज हा शतक ठोकून बाद झाला. त्याने केलेल्या खेळीमुळे श्रीलंकेला अडीचशे पर्यंत मजल मारता आली. मॅथ्यूजने १२८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकार लगावत ११३ धावा केल्या. बुमराहने ३ तर पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप आणि जाडेजा यांनी १-१ बळी टिपला.