गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या नितीन पटेल यांना त्यांच्या मनासारखे खाते न मिळाल्याने ते नारज असून मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची वादावादी झाल्याचे वृत्त आहे. या वादाचा राजकीय फायदा घेण्यासाठी पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेल यांने नितीन पटेल यांच्यापुढे मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपमधून बाहेर पडणार असाल तर तुम्हाला काँग्रेसमध्ये योग्य पद आणि सन्मान देण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी ऑफर हार्दिकने दिली आहे.


भाजपामध्ये त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना योग्य सन्मान दिला जात नाही. त्यामुळे सर्व नाराजांनी पक्षाविरोधात बंड करायला हवे. नितीन पटेल आमच्यासोबत येऊ शकतात. भाजपामध्ये त्यांना योग्य सन्मान मिळत नसेल तर त्यांनी पक्ष सोडायला हवा. त्यांनी पक्षासाठी खूप मेहनत केली आहे, असे माध्यमांशी बोलताना हार्दिकने म्हटले आहे.
जर नितीन पटेल भाजप सोडणार असतील तसेच त्यांच्यासोबत १० समर्थक आमदारही पक्ष सोडणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करतो. मी त्यांच्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करेन आणि त्यांना योग्य पद देण्यास सांगेन, असे हार्दीकने म्हटले आहे.

काँग्रेसचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष भारतसिंह सोलंकी म्हणाले, काँग्रेसची सर्व परिस्थितीवर नजर आहे. आनंदीबेन पटेल यांच्यानंतर आता नितीन पटेल यांच्या नेतृत्वावर शंका घेतली जात आहे. जर आम्हाला काही भाजप आमदार आणि नितीन पटेल यांचे समर्थन मिळाले तर आम्ही गुजरातच्या फायद्यासाठी सरकार बनवण्यास तयार आहोत.

नितीन पटेल यांच्याबरोबरच वडोदराचे आमदार राजेंद्र त्रिवेदी हे भाजपवर नाराज आहेत. कारण वडोदरातून कोणत्याही आमदाराचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे भडकलेल्या त्रिवेदी यांनी आपल्या १० समर्थक आमदारांसह पक्ष सोडण्याची धमकीही दिली आहे. अशीच धमकी दक्षिण गुजरातच्या काही नेत्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिली आहे.