आयआयटी कानपूरमध्ये सायबर सुरक्षा प्रकल्पासाठी काम करणाऱ्या २५ वर्षीय इंजिनिअर महिलेवर तिच्याच प्रोजेक्ट मॅनेजरने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. पीडितेने सांगितले की, आरोपीने आधी मैत्री केली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवले. काही दिवसांपूर्वी जन्मदिनाच्या पार्टीनिमित्त फ्लॅटवर बोलावून बळजबरीने मद्य पाजले आणि मित्रांसमोर नृत्य करण्यास भाग पाडले, असा आरोप पीडितेने केला आहे. पीडित तरुणी अनुसूचित जमातीमधून येते. तिने सांगितले की, आरोपीने लग्नाचे वचन देऊन माझे शारीरिक शोषण करण्यात आले. जेव्हा लग्नाचा विषय काढला तेव्हा जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडितेच्या तक्रारीनंतर कल्याणपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच आयआयटी कानपूर प्रशासनानेही सहा सदस्यांची एक समिती चौकशीसाठी नेमली आहे. कल्याणपूर पोलीस ठाण्याचे सह आयुक्त अभिषेक पांडे यांनी सांगितले की, सदर तरुणी एक वर्षांपासून आयआयटी कानपूरमध्ये ॲनालिस्ट म्हणून काम करत होती

आरोपी मुळचा मध्य प्रदेशातील इंधूर येथे राहणारा आहे. अद्याप त्याला अटक झालेली नाही. आयआयटीचे संचालक महिंद्रा अग्रवाल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, आम्ही स्थापन केलेल्या समितीने त्यांचा अहवाल सादर केल्यानंतर आरोपीविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल. आरोपांमधील गांभीर्य पाहून आम्ही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करत आहोत. आयआयटी कानपूरमध्ये निर्भय, सुरक्षित आणि सर्वसमावेश वातावरण निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

१२ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

कानपूरमध्येच आणखी एक विचित्र घटना घडली आहे. गंगागंज परिसरात राहणाऱ्या एका क्रिकेट प्रशिक्षकाने त्याच्या कॉलनीतील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अंमली पदार्थ देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तीन महिन्यांपासून आरोपी पीडितेला कॉफितून अंमली पदार्थ देऊन अत्याचार करत होता. तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारून टाकू, अशी धमकी त्याने दिली होती. तसेच आरोपीकडून जातीवाटक शिवीगाळही केली जात होती. पीडित अल्पवयीन मुलीने आईला हा प्रकार सांगितल्यानंतर आरोपीविरोधात पोक्सो आणि ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iit kanpur analyst accuses colleague of raping her after drinking alcohol made to dance on pretext of marriage kvg