संक्षिप्त: राजस्थानात लवकरच आण्विक इंधन संकुल
नवी दिल्ली : आण्विक इंधनावर पुनप्र्रक्रिया करण्यासाठी एका संकुलाची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे. राजस्थानातील कोटा येथे रावतभाटा अणू ऊर्जा प्रकल्पानजीक हे संकुल उभारले जाणार असून देशातील अशा प्रकारचे हे दुसरे संकुल आहे. त्यासाठी सुमारे २४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. १२ व्या पंचवार्षिक योजनेत आण्विक ऊर्जा प्रकल्पांद्वारे १७, ३०० मेगाव्ॉट इतकी विद्युतनिर्मिती करण्याचे उद्दीष्ट आखून देण्यात आले आहे. भारतात सध्या कार्यान्वित असलेल्या अणू ऊर्जा प्रकल्पांद्वारे ५५०० मेगाव्ॉट विद्युतनिर्मिती केली जाते. भारताची वाढती ऊर्जा गरज लक्षात घेता त्याची पूर्तता करण्याची सध्या हैदराबाद येथे असलेल्या आण्विक इंधन संकुलाची क्षमता नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
इराकमध्ये कार बाँबस्फोटात
१९ जण ठार
बघदाद : इराकमध्ये गेले काही महिने अविरत सुरू असलेले कार बाँब हल्ल्यांचे सत्र अजूनही थांबलेले नाही. शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी झालेल्या कार बाँबहल्ल्यांच्या विविध घटनांमध्ये किमान १९ जण ठार झाले. इराकच्या राजधानीच्या मध्यवर्ती भागात हे स्फोट घडविण्यात आले. एकूण चार कार बाँबस्फोटांमध्ये ४३ जण जखमी झाले असल्याची माहिती इराकच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यांची जबाबदारी जरी कुठल्याही एका गटाने घेतली नसली तरीही अल कायदाशी संबंधित असलेल्या दहशतवादी गटाचेच हे कृत्य असावे, असा संरक्षण तज्ज्ञांचा अंदाज आहे.
बिहारमध्ये ४ नक्षली कमांडर अटकेत
पाटणा : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर बिहारमध्ये नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली असून, बिहार पोलिसांच्या विशेष कारवाई पथकाने चौघा नक्षली कमांडरना अटक केली आहे. उत्तर बिहारमध्ये, अनेकांची हत्या केल्याचा तसेच खंडणी उकळल्याचा आरोप या चौघाजणांवर आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्य़ातील सुहासा आणि सुहासी या गावांमध्ये माओवाद्यांनी ‘हौतात्म्य मेळा’ आयोजित केल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता, त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.
कोळ्याच्या पाच नव्या प्रजातींचा शोध
बीजिंग : आग्नेय चीनमधील गुहांमध्ये कोळ्याच्या पाच नव्या प्रजातींचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे. सामान्यपणे मातीत आढळणारा हा कोळी प्रथमच गुहांमध्ये आढळल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे. ‘चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’मधील संशोधकांनी यासाठी २००० हून अधिक गुहा पालथ्या घातल्या. गेल्या दहा वर्षांत चीनमध्ये कोळ्यांवर प्रचंड संशोधन झाले असून त्यामुळे, पूर्वी ज्ञात असलेल्या कोळ्यांच्या प्रजातींची संख्या २३०० वरून आता एकदम ४३०० वर गेली आहे.
उत्तर प्रदेशात जगातील सर्वात उंच मंदिर
वृंदावन : जगातील सर्वात उंच म्हणून ज्याची नोंद होईल, असे ७० मजली भव्य मंदिर उत्तर प्रदेशात लवकरच उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते या प्रकल्पाचा कोनशिला संमारंभ पार पडला. ‘वृंदावन चंद्रोदय मंदिर’ असे या मंदिराचे नाव असून, त्याच्या उभारणीसाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या पाच वर्षांत मंदिर भाविकांसाठी खुले होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या मंदिराची उंची २१३ मीटर असून श्रीकृष्णाचे जन्मस्थान जगाच्या नकाशावर कोरले जावे, या उद्देशाने ते उभारले जात आहे.
काश्मीरमध्ये दुसऱ्या दिवशी संचारबंदी
श्रीनगर : येथील बांदीपोरा जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या दिवशी संचारबंदी लागू असून जनजीवन अद्यापही विस्कळीतच आहे. शुक्रवारी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे या परीसरात तणाव निर्माण झाला होता. र्हुीयत कॉन्फरन्सतर्फे रविवारी बंद पुकारण्यात आला होता. बंदच्या काळात हिंसाचाराच्या काही घटना घडल्या. ज्यात, पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली तसेच, पोलिसांच्या गाडय़ा पेटवून देण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला
पूंछ : येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक अतिरेक्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला. लोकसभा निवडणुकांच्या पाष्टद्धr(२२४)र्वभूमीवर काश्मीरमध्ये हल्ले घडवून दहशत निर्माण करण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न होता. मात्र लष्कराच्या सतर्कतेमुळे, एके ४७ रायफल आणि अनेक स्फोटकांसह एका अतिरेक्याला अटक करण्यात आली. २०११ मध्ये या अतिरेक्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेतले होते, अशी माहिती लष्करी प्रवक्त्यांनी दिली.
विमानप्रवाशाकडून सोने जप्त
कोईम्बतूर : शारजाहून येथे आलेल्या एका केरळी विमान प्रवाशाकडून जवळपास एक किलो सोने सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केले. १.१ किलो सोने तस्करी करून या प्रवाशाने आणले होते. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मोहम्मद शफी या प्रवाशाचे सामान एकदा तपासले. त्यानंतर प्रवाशाच्या हालचालींवरून संशय आल्याने पुन्हा तपासणी करण्यात आली तेव्हा १.१ किलो सोन्याची जाड पट्टी सापडली, असे पोलिसांनी सांगितले. सुटकेसच्या आत तयार केलेल्या लोखंडी कप्प्यामध्ये ती लपवली होती.