वृत्तसंस्था, चेन्नई : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ‘सेंगोल’ स्थापित केला जाणार आहे. ब्रिटिशांकडून भारताकडे सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून अखेरचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे हा सेंगोल दिल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदांमध्ये केला. मात्र, या दाव्यांना ठोस कागदोपत्री पुराव्याचा आधार नसल्याचे समोर येत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळत असताना तेव्हा प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये आणि त्यासंबंधीच्या पुस्तकांमध्ये सेंगोलचा ‘सत्तेचे प्रतीकात्मक हस्तांतरण’ म्हणून उल्लेख नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरकारचा आताचा दावा काय?

विद्यमान सरकारकडून देण्यात येत असलेल्या माहितीनुसार, लॉर्ड माउंटबॅटन यांनी सत्तेचे हस्तांतरण दर्शवण्यासाठी एखादी प्रक्रिया आहे का अशी विचारणा नेहरू यांच्याकडे केली. त्यावर नेहरूंनी भारताचे अखेरचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी यांच्याशी सल्लामसलत केली. त्यावर त्यांनी तमिळनाडूमधील तिरुववदूतुराई अधीनम मठाला या सेंगोलची निर्मिती करायला सांगितले. त्यानंतर एका विशेष विमानाने हा सेंगोल दिल्लीला नेण्यात आला.

प्रत्यक्षात, सेंगोल नेणारे शिष्टमंडळ रेल्वेने गेल्याचे छायाचित्रातून दिसते. अधीनम मठाचे प्रमुख श्री अंबालवण पंडारासन्नाधी स्वामीगल यांनी हा सेंगोल नेहरूंना भेट दिल्याचे पुष्कळ पुरावे आहेत. मात्र, त्याकडे सरकार आणि तेव्हाच्या सरकारने सत्तेचे प्रतिकात्मक हस्तांतरण म्हणून पाहिल्याचे पुरावे नाहीत.

सीतारामन यांचा दावा काय?

पत्रकार परिषदेत सीतारामन यांनी पत्रकारांना देण्यात आलेल्या माहितीपत्रकांमध्ये हवे तितके कागदोपत्री पुरावे असल्याचा दावा केला. या कथित पुराव्यांमध्ये काही पुस्तके, लेख आणि काही बातम्यांचा समावेश आहे, तसेच समाजमाध्यमांवरील दावे आणि ब्लॉगचाही समावेश आहे. मात्र, कोणत्याही लेखामध्ये किंवा बातमीमध्ये सेंगोल हे सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक असल्याचा किंवा राजगोपालचारी यांनी तसा काही सल्ला दिल्याचे आढळत नाही.

सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून उल्लेख नाही

‘टाइम’ मासिकाच्या २५ ऑगस्ट १९४७ च्या अंकामधील लेखानुसार, प्राचीन काळात हिंदू साधू हिंदू राजांना सेंगोल देत असत. त्याप्रमाणे हा सेंगोल नेहरूंना दिला जात असल्याची भावना मठाच्या शिष्टमंडळामध्ये आढळली. मात्र, पंडित नेहरू किंवा सरकारचे कोणीही प्रतिनिधींचे हेच मत असल्याचा त्यामध्ये उल्लेख नाही. ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’ या पुस्तकामध्ये टाइम मासिकाप्रमाणेच उल्लेख आढळतो. त्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरी अँडरसन आणि यास्मिन खान यांच्या लिखाणामध्ये नेहरू काही धार्मिक विधींमध्ये सहभागी झाल्याची टीका आहे, मात्र त्यांनीही सेंगोलचा वापर सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून केल्याचा उल्लेख नाही. तसेच हे सेंगोल आधी लॉर्ड माउंटबॅटन यांना आणि नंतर नेहरूंना दिल्याचा कोणताही उल्लेख आढळत नाही.

याला अपवाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत असलेले एस गुरुमुर्ती यांच्या ‘तुघलक’ मासिकामधील २०२१ च्या लेखाचा. त्यामध्ये कांची कामकोटी पीठाचे ६८ वे प्रमुख श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी त्यांच्या आठवणीतून १९७८ मध्ये आपल्या शिष्याकडे जे वर्णन केले आहे, तोच दावा सरकारकडून केला जात आहे.

तमिळ लेखकांचे दावे

तमिळ लेखक जयमोहन यांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप हिस्टरी’ या ब्लॉगचाही पुरावा देण्यात आला आहे. प्रत्यक्षात या ब्लॉगमध्ये जयमोहन यांनी सेंगोलसंबंधी सांगोवांगीच्या गोष्टींची खिल्ली उडवली आहे. हा सेंगोल स्वातंत्र्याच्या वेळी देशभरातून आलेल्या अनेक भेटींपैकीच एक असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्याप्रमाणेच तमिळनाडू सरकारने २०२१-२२ च्या वार्षिक धोरणपत्रकामध्ये सेंगोल हा सत्तेचे हस्तांतरणाचे प्रतीक असल्याचे म्हटले होते. नंतर मात्र, त्यांनी हा उल्लेख काढून टाकला.

संसद भवन उद्घाटनासंबंधी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करावे यासाठी लोकसभा सचिवालयाला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. न्या. जे के माहेश्वरी आणि न्या. पी एस नरसिंह यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते आणि वकील जय सुकीन यांना सांगितले की, ही याचिका का आणि कशी दाखल करण्यात आली आहे हे न्यायालयाला समजते आणि राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२ अंतर्गत याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालय राजी नाही. राष्ट्रपती या देशाच्या कार्यकारी प्रमुख असल्यामुळे त्यांना उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात यावे असे सुकीन म्हणाले. मात्र, खंडपीठाला याचिकेवर सुनावणी घ्यायची नसल्यास याचिका मागे घेण्याची अनुमती द्यावी. त्यानंतर न्यायालयाने याचिका मागे घेतली असे मानून फेटाळली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of the new parliament house center sengol evidence ysh