लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरच ३०० आयकर आधिकाऱ्यांनी देशभरात ५० ठिकाणी छापे मारत कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे. दिल्लीच्या आयकर विभागाने आज मध्य प्रदेशमध्ये प्रवीण कक्कर यांच्या घरावर छापा टाकत आतापर्यंत ९ कोटींची रोकड जप्त केली आहे. प्रवीण कक्कर हे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव म्हणून काम पाहतात. प्रवीण कक्कर यांच्या इंदूरमधील घरावर रविवारी पहाटे तीन वाजता अचानक आयकर विभागाने छापा टाकला.

प्रवीण कक्कर यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा संशय आहे. कक्कर यांच्या घराची १५ अधिकारी झाडाझडती घेत आहेत. कमलनाथ मुख्यमंत्रिपदी झाल्यानंतर भुपेंद्र गुप्ता यांच्याजागी कक्कर यांची नियुक्ती करण्यात आली होती.  कक्कर यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदकानं सन्मानित केलं होतं. इंदोरशिवाय दिल्ली, भोपाळ आणि गोव्यामध्ये आयकर विभागाने तब्बल ५० ठिकाणी आज रविवारी छापेमारी केली आहे.

 भोपाळ येथील प्रतिक जोशी यांच्या घरातून आयकर विभागाने लाखोंची रोकड जप्त केली आहे. इंदोर, भोपाळ, गोवा आणि दिल्लीतील तब्बल ५० ठिकाणी ३०० आधिकाऱ्यांनी छापा मारला असून अद्याप कारवाई सुरूच आहे.