Independence Day 2022: भारतीय लष्कर, हवाईदल आणि नौदलाकडून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सहा खंडांमध्ये, तीन महासागरांच्या साक्षीने आणि सहा वेगवेगळ्या वेळेनुसार भारतीय स्वातंत्र्यांचा उत्सव जगभरात साजरा करण्यात येत आहे

Independence Day 2022: भारतीय लष्कर, हवाईदल आणि नौदलाकडून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
(फोटो सौजन्य-पीआयबी)

भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेनेकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियानाचा एक भाग म्हणून भारतीय नौदलाच्या जहाजांकडून अंटार्क्टिका सोडून प्रत्येक खंडातील काही बंदरांना भेटी दिल्या जात आहेत. भारतीय जहाजांच्या भेटीदरम्यान या बंदरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय नागरिक आणि स्थानिकांच्या उपस्थितीत आज काही आंतरराष्ट्रीय बंदरांवर ध्वजारोहण करण्यात आले. सहा खंडांमध्ये, तीन महासागरांच्या साक्षीने आणि सहा वेगवेगळ्या वेळेनुसार भारतीय स्वातंत्र्यांचा उत्सव जगभरात साजरा करण्यात येत आहे.

या खंडामधील यजमान देशांच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम साजरे केले जात आहेत. भारतीय दुतावासाकडून या देशांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमांसह सार्वजनिक ठिकाणी बँड वादन, विद्यार्थ्यांसाठी विविध सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय काही जहाजं पर्यटकांसाठी देखील खुली करण्यात आली आहेत.

इंग्लंडच्या लंडनमध्ये ‘आयएनएस तरंगिणी’च्या कर्मचाऱ्यांकडून दोन महायुद्धांमध्ये सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रकुल स्मारकांच्या प्रवेशद्वारांजवळ हा कार्यक्रम पार पडला. भारतीय नौदलाकडून सिंगापूरच्या ‘क्रांजी युद्ध स्मारका’ला पुष्पहार अर्पण करण्यात आला. केनियाच्या मोम्बासामध्ये तैत्वा तावेता भागात युद्ध स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. या परिसरात पहिल्या महायुद्धादरम्यान भारतीय जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. या कार्यक्रमात भारतीय नौदलातील अधिकारी सहभागी झाले होते. या उद्घाटन समारंभात युद्धभूमीच्या दौऱ्यांसह मोबाईल प्रदर्शन, भारतीय सैनिकांचे योगदान आणि भारताचा स्वातंत्र्यलढा अधोरेखित करणाऱ्या एका कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून २०२१-२२ या वर्षात भारतीय नौदलाने ७५ बंदरांना भेटी दिल्या. याशिवाय विविध ठिकाणी नौकानयन, पर्वतारोहण, किनारपट्टी स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव भारतीय वायू दलाकडूनही मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातील छायाचित्र ट्वीट करून देशवासियांना भारतीय वायू दलाने शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय लष्कराने तामिळनाडूच्या कन्याकुमारीतील विवेकानंद दगडावर ७५ फुटांचा तिरंगा फडकावला आहे. स्वातंत्र्यदिन उत्सवाचा भाग म्हणून ११ ऑगस्टला लष्कराकडून हे ध्वजारोहण करण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“मोदी सरकारची आठ वर्ष म्हणजे अमृतकाळ”, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून पंतप्रधान मोदींना प्रशस्तिपत्रक
फोटो गॅलरी