संयुक्त राष्ट्रे : गाझामध्ये ‘तात्काळ, विनाअट आणि कायमस्वरूपी’ युद्धबंदीची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील मसुद्याच्या ठरावावर मतदान करण्यापासून भारताने तटस्थ भूमिका घेतली. स्पेनने सादर केलेल्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदान झाले. या ठरावात तत्काळ, बिनशर्त आणि कायमस्वरूपी युद्धबंदी आणि हमास आणि इतर गटांनी ताब्यात घेतलेल्या सर्व ओलिसांची तत्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याचे आवाहन करण्यात आले.
‘नागरिकांचे संरक्षण आणि कायदेशीर आणि मानवतावादी दायित्वे राखणे’ या शीर्षकाच्या ठरावावरील मतदानाचे स्पष्टीकरण देताना, गाझामधील ढासळत असलेल्या मानवतावादी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा ठराव आणण्यात आला असल्याचे संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश म्हणाले. भारताला वाढत्या मानवीय संकटाची तीव्र चिंता आहे आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल आम्ही निषेध करतो, असेही ते या वेळी म्हणाले. भारताने नेहमीच शांतता आणि मानवतेला पाठिंबा दिला असून नागरिकांचे संरक्षण आणि मानवतावादी जबाबदाऱ्यांचे पालन करण्याचे तसेच गाझातील नागरिकांना सुरक्षित, शाश्वत आणि वेळीच मदत पुरविण्याचे वारंवार आवाहन केले आहे, यावर त्यांनी भर दिला.
१४९ देशांचा पाठिंबा, १२ देशांचे विरोधात मतदान
भारतासह १९ देशांनी मतदानात भाग घेतला नाही, तर १२ देशांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले आणि १४९ देशांनी बाजूने मतदान केले. मतदानात तटस्थ राहिलेल्या देशांमध्ये अल्बानिया, कॅमरून, इक्वाडोर, इथिओपिया, मलावी, पनामा, दक्षिण सुदान आणि टोगो या देशांचा समावेश होता.
सतत आरोप आणि वाद हे शांततेच्या मार्गातील अडथळे आहेत. संवाद आणि अंतर्दृष्टीशिवाय संघर्ष सोडविण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. दोन्ही विचारसरणींनी एकत्र येण्यासाठी संयुक्त प्रयत्न केले पाहिजेत. या मुद्द्यांमुळेच आम्ही या प्रस्तावावरील चर्चेत भाग घेत नाही.– पार्वतानेनी हरीश, स्थायी प्रतिनिधी भारत, संयुक्त राष्ट्रे