मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याची पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने सुटका केल्याबद्दल भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलावून तीव्र निषेध नोंदवला, तसेच आपली अस्वस्थता व चिंता व्यक्त केली. लख्वी तुरुंगाबाहेर येऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे, अशी समज त्यांना देण्यात आली.
परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे सध्या पंतप्रधानांसोबत दौऱ्यावर असल्यामुळे प्रभारी परराष्ट्र सचिव अनिल वाधवा यांनी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना साऊथ ब्लॉकमधील कार्यालयात बोलावले आणि न्यायालयाच्या आदेशाबाबत भारताची तीव्र नापसंती कळवली. पाकिस्तानच्या भारतीय उच्चायुक्तालयामार्फत हे प्रकरण तेथेही ‘वरच्या पातळीवर’ उपस्थित करण्यात आले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
न्यायालयाने लख्वीच्या सुटकेचा आदेश दिल्याबद्दल गृहराज्यमंत्री किरेन रिज्जू यांनी पाकिस्तानला दोष दिला. लख्वीविरुद्ध पुरेसा पुरावा असूनही पाकिस्तानने तो न्यायालयासमोर मांडला नाही. दहशतवादाकडे जागतिक समुदाय ज्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यानुसारच पाकिस्तानने दहशतवाद्यांशी वागावे असे आम्हाला वाटते. ‘चांगला दहशतवादी’ आणि ‘वाईट दहशतवादी’ असे काही नसल्याची बाब साऱ्या जगाने स्वीकारली असल्याचे ते म्हणाले.
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि २००८ सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार याच्या स्थानबद्धतेचा आदेश बेकायदेशीर ठरवून इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्याची त्वरित सुटका करण्याचा आदेश दिल्यानंतर लगेच भारताने आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. लख्वीसह सात जणांवर मुंबईवर हल्ल्याची योजना आखून तिची अंमलबजावणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
मुंबईवरील हल्ल्यासाठी रचल्या गेलेल्या गुन्हेगारी कटात लख्वीच्या भूमिकेबाबत असलेले जबरदस्त पुरावे पाकिस्तानी संस्थांनी न्यायालयासमोर मांडले नाहीत. हे विनाविलंब व्हायला हवे, अशी अपेक्षा गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने व्यक्त केली. मुंबईवरील हल्ल्याची तयारी करणाऱ्यांना शिक्षा देण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल भारताने वारंवार आपली चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी त्यांचे पाकिस्तानातील समपदस्थ एजाझ अहमद चौधरी यांच्यासोबतच्या भेटीतही हा विषय काढला होता.
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2015 रोजी प्रकाशित
लख्वीची सुटकेच्या आदेशावर भारताची तीव्र नाराजी
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याची पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने सुटका केल्याबद्दल भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलावून तीव्र निषेध नोंदवला, तसेच आपली अस्वस्थता व चिंता व्यक्त केली.

First published on: 14-03-2015 at 02:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India summons pakistan envoy says islamabad did not produce evidence against lakhvi