येत्या २०५० या वर्षांपर्यंत जगात भारत चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनणार आहे असे एका फ्रेंच अभ्यास अहवालात म्हटले आहे. या शतकाच्या मध्यावधीपर्यंत जगाची लोकसंख्या ९.७ अब्जापर्यंत पोहोचेल, असा अंदाजही जागतिक लोकसंख्या वाढीबाबत वर्तवण्यात आला आहे.
फ्रेंच इन्स्टिटय़ूट ऑफ डेमोग्राफिक स्टडीज या संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार भारत जगात लोकसंख्येमध्ये पहिल्या क्रमांकावर राहील व २०५०च्या सुमारास भारताची लोकसंख्या ही १.६ अब्जाच्या घरात पोहोचलेली असेल तर चीन दुसऱ्या स्थानावर राहील, सध्या चीनची लोकसंख्या १.३ अब्ज आहे.
जगाची लोकसंख्या सध्या ७.१ अब्ज असून ती इ.स. २०५० पर्यंत ९.७ अब्ज होईल, असे या अहवालात म्हटले आहे. सध्या चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून, त्याची लोकसंख्या १.३ अब्ज आहे. त्याखालोखाल दुसरा क्रमांक भारताचा असून, त्याची लोकसंख्या १.२ अब्ज आहे. अमेरिका (३१.६२ कोटी), इंडोनेशिया (२४.५ कोटी), ब्राझील (१९.५५ कोटी) याप्रमाणे इतर देशांची लोकसंख्येतील क्रमवारी आहे. फ्रेंच इन्स्टिटय़ूट ऑफ डेमोग्राफिक स्टडीज या संस्थेचे हे ताजे अंदाज जागतिक बँक व संयुक्त राष्ट्रे यांनी लोकसंख्या वाढीबाबत केलेल्या अंदाजाशी जुळणारे असेच आहेत.
जूनमध्ये संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या अंदाजानुसार २०५०मध्ये जागतिक लोकसंख्या ९.६ अब्ज होण्याचा अंदाज आहे. गेल्या दोनशे वर्षांत जगाची लोकसंख्या सातपट वाढली असून, ती २१व्या शतकाच्या अखेरीस १० ते ११ अब्ज होण्याची शक्यता आहे, असे फ्रेंच संस्थेचे संशोधक हिलीस पायसन यांनी सांगितले.
या अहवालानुसार २०५०पर्यंत इतर देशांची लोकसंख्या अंदाजे खालीलप्रमाणे असेल- नायजेरिया ४४.४ कोटी, अमेरिका ४० कोटी, इंडोनशिया ३६.६ कोटी, पाकिस्तान ३६.३ कोटी, ब्राझील २२.७ कोटी, बांगलादेश २०.२ कोटी, काँगो १८.२ कोटी, इथिओपिया १७.८ कोटी, फिलिपीन्स १५.२ कोटी, मेक्सिको १५ कोटी, रशिया १३.२ कोटी, टांझानिया १२.९ कोटी, इजिप्त १२.६ कोटी, युगांडा ११.४ कोटी, व्हिएतनाम १०.९ कोटी, इराण ९.९ कोटी. जपान ९.७ कोटी, केनिया ९.७ कोटी, टर्की ९.३ कोटी, इराक ८.३ कोटी, इंग्लंड ७.९ कोटी, जर्मनी ७.६ कोटी, फ्रान्स ७.२ कोटी, सुदान ६.९ कोटी, नायजर ६.६ कोटी, दक्षिण आफ्रिका ६.४ कोटी, मोझांबिक ६.३ कोटी, कोलंबिया ६.३ कोटी.