अमेरिकी प्रशासनाचे स्पष्टीकरण
आशियात शांतता, स्थिरता व भरभराटीसाठी भारत व अमेरिका यांचे सहकार्य राहील पण त्यासाठी हिंदी महासागर किंवा दक्षिण चिनी सागरात संयुक्त सागरी गस्त घालण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही असे अमेरिकी प्रशासनाने म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितले की, सध्या तरी नौदलाच्या माध्यमातून संयुक्त सागरी गस्त घालण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. दोन्ही देशात आशियातील शांतता, स्थिरता व भरभराटीच्या मुद्दय़ावर सहकार्य आहे.
हिंदी महासागर किंवा दक्षिण चीन महासागरात संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव असल्याबाबत विचारले असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.
भारत व अमेरिका यांच्यात अलीकडे संयुक्त नौदल गस्तीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते त्यात वादग्रस्त दक्षिण चिनी सागराचाही समावेश होता. चीनने महासागरात कृत्रिम बेट तयार करून तेथे दावा सांगितला आहे.