मालदीवमधल्या भीषण राजकीय पेचप्रसंगामध्ये भारत लष्करी हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. मालदीवमधल्या सगळ्या घडोमोडींवर सरकार लक्ष ठेवून असून गरज पडल्यास भारत या शेजारी राष्ट्रात लष्कर घुसवण्याची शक्यता आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर नौदलाच्या दोन बोटी कुठलीही सागरी कारवाई करण्यास सज्ज असून अल्पावधीतच भारतीय लष्कर मालदीवच्या किनाऱ्याला लागू शकतं.

मालदीवच्या माजी अध्यक्षांनी महंमद नाशीद यांनी भारताला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. सध्याचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी आणिबाणी जाहीर केली असून वरीष्ठ न्यायाधीशांना अटक करण्यात आली आहे.

भारताच्या लष्कराचे काही अधिकारी लष्करी सहकार्यासाठी मालदीवमध्ये उपस्थित असून गरज पडल्यास कुठल्याही प्रकारे भारताचे हित सांभाळण्यासाठी लष्कर हस्तक्षेप करू शकते असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. भारत व मालदीव यांच्यात अनेक लष्करी सहकार्याचे करार आहेत, त्यामुळेही युद्धनौका, लढाऊ विमानं आणि ठराविक प्रमाणात सैनिक या क्षेत्रामध्ये कायम उपलब्ध असतात. त्यामुळे सरकारने आदेश देताक्षणी भारत मालदीवमध्ये लष्कर घुसवू शकते अशी स्थिती आहे.

मालदीवला प्रत्येक संकटात मदत करणं ही भारताची भूमिका राहिलेली आहे. याआधीही 1988 मध्ये तत्कालिन अध्यक्षांविरुद्ध उठावाचा प्रयत्न झाला असता राजीव गांधी सरकारने युद्धनौका व सैन्य धाडून मालदीवला परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली होती.