उत्तर काश्मिरातील हंदवाडा आणि दक्षिण काश्मीरमधील कुपवाडा या शहरांमध्ये निदर्शक विद्यार्थी आणि सुरक्षा दले यांच्यात शनिवारी चकमकी झडून त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले.

पुलवामा जिल्ह्य़ाच्या नेवा भागातील शासकीय उच्च माध्यमिक शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सुरक्षा दलांच्या कथित अरेरावीच्या विरोधात निदर्शने केली. सुरक्षा दलांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र त्यांनी यास नकार दिल्यानंतर चकमकी उडाल्या.

विद्यार्थ्यांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केल्यामुळे त्यांनी आधी छडीमार केला व नंतर अश्रुधुराच्या फैरी झाडल्या, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अखेरचे वृत्त आले तेव्हा या चकमकी सुरू होत्या.

कुपवाडा जिल्ह्य़ातही अशाच प्रकारची निदर्शने होऊन शासकीय डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षा दलांशी चकमकी उडाल्या. विद्यार्थ्यांनी दगडफेक सुरू केल्यामुळे सुरक्षा यंत्रणांना बळाचा वापर करावा लागला, असे हा अधिकारी म्हणाला.

पुलवामातील एका शासकीय महाविद्यालयात १५ एप्रिलला पोलिसांनी छापे घातल्याने विद्यार्थ्यांनी १७ एप्रिलला काश्मीर खोऱ्यात सर्वत्र निदर्शने केली होती. तेव्हापासून या निदर्शनांचे सत्र सुरूच आहे. यामुळे गेल्या महिन्यात उच्च शैक्षणिक संस्थांमधील अध्यापन एका आठवडय़ाहून अधिक काळ स्थगित ठेवणे अधिकाऱ्यांना भाग पडले होते.

युवकांचा छळ करणाऱ्या दहशतवाद्यांची चित्रफित

श्रीनगर : समाजमाध्यमांवर बंदी असतानाही, हिज्बुल मुजाहिदीनचे संशयित दहशतवादी दोन युवकांवर सुरक्षा दलांचे खबरे असल्याचा आरोप करून त्यांचा छळ करत असल्याचे दाखवणारा एक नवा व्हिडीओ काश्मीरमध्ये फिरत आहे.

लष्करी गणवेश घातलेले हे दहशतवादी एका अज्ञात स्थळी दोन युवकांचे मुंडन करताना या व्हिडीओ क्लिपमध्ये दिसत आहेत. यानंतर ते या दोघांना काठय़ांनी मारहाण करतात आणि त्यांचे डोके पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवतात. स्थानिक पोलीस दलात विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) म्हणून निवड होण्यासाठी हे दोघे सुरक्षा दलांचे खबरे म्हणून काम करत असल्याचा आरोप हे दहशतवादी त्यांच्यावर करत असताना दिसतात.

छळ होत असलेल्या युवकांनी दयेची याचना करून, दहशतवाद्यांनी लावलेल्या आरोपांची ‘कबुली’ दिल्यानंतर ते लोक या दोघांना सोडून देतात, असे व्हिडीओत दिसत आहे. आपण या व्हिडीओची दखल घेतली असून याबाबत तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

दहशतवादी संघटनेच्या तिघांना अटक

श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्य़ातून पोलिसांनी एका दहशतवादी संघटनेच्या ३ कार्यकर्त्यांना अटक केली असून त्यांच्याजवळून २ हँडग्रेनेड्स जप्त केले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी या जिल्ह्य़ातील चेकोरा व हाजिपोरा खेडय़ांमधील तपासणीदरम्यान या तिघांना पोलिसांनी पकडल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पकडण्यात आलेल्या तिघांची नावे अकील अहमद मल्ला, आसिफ अब्दुल्ला वागे आणि अमिर हुसेन गनाई अशी असून त्यांच्याजवळून चिनी बनावटीचे ३ बॉम्ब जप्त करण्यात आले. या तिघांविरुद्ध बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा तसेच शस्त्रविषयक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दहशतवाद्यांनी टेहळणीसाठी पाठवलेला मुलगा स्थानबद्ध

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्य़ात नियंत्रण रेषेनजिकची सीमा ओलांडून भारतीय हद्दीत आलेल्या पाकव्याप्त काश्मिरातील १२ वर्षांच्या एका मुलाला लष्कराने ताब्यात घेतले आहे. घुसखोरीचे मार्ग तसेच लष्कराच्या गस्तीच्या मार्गाची टेहळणी करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या संगनमताने दहशतवाद्यांनी त्याला पाठवले असल्याचा लष्कराला संशय आहे. राजौरी जिल्ह्य़ाच्या नौशेरा भागात सीमा ओलांडून भारतात आलेल्या पाकव्याप्त काश्मिरातील १२ वर्षांच्या एका मुलाला नियंत्रण रेषेवर गस्त घालणाऱ्या लष्कराच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी पकडले, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.

अश्फाक अली चौहान नावाचा हा मुलगा पाकव्याप्त काश्मीरमधील डुंगेर पाल खेडय़ाचा रहिवासी आणि बलोच रेजिमेंटच्या निवृत्त सैनिकाचा मुलगा आहे. नियंत्रण रेषेनजिक भारतीय बाजूला तो संशयास्पद हालचाली करताना आढळला. लष्कराच्या गस्तिपथकाने हटकले असता त्याने लगेच शरणागती पत्करली. सुरुंग पेरण्यात आलेल्या लष्करी भागात टेहळणी करण्यासाठी १२ वर्षांच्या मुलाला पाठवून पाकिस्तानने मानवाधिकारांचे कसे उल्लंघन केले हे यावरून उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

दक्षिण काश्मीरमधील बँकांच्या शाखांत रोखीचे व्यवहार बंद

श्रीनगर : दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील बँकांना लक्ष्य केल्यामुळे पुलवामा व शोपियान जिल्ह्य़ांच्या संवेदनशील भागांतील सुमारे ४० शाखांमध्ये रोखीचे व्यवहार थांबवण्यात आले आहेत.

दहशतवाद्यांकडून असे आणखी हल्ले होण्याची शक्यता असल्यामुळे या दोन जिल्ह्य़ांमध्ये कार्यरत असलेल्या बँकांनी या भागातील शाखांमध्ये रोख रक्कम पाठवणे थांबवण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणांनी जारी केल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी अलीकडेच लक्ष्य बनवलेल्या जम्मू अँड काश्मीर बँक तसेच इलाकाई देहाती बँकांच्या शाखांमध्ये रोकड व्यवहार थांबवण्यात आले आहेत.

दहशतवादी असे आणखी हल्ले करू शकतात, अशी गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे या यंत्रणांनी संवेदनशील म्हणून निश्चित केलेल्या शाखांमध्ये रोख पाठवणे आम्ही बंद केले आहे, असे जम्मू- काश्मीर बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र या भागात एटीएम सेवांसह इतर बँकिंग सेवा सुरू राहतील, असे तो म्हणाला.