गेल्यावर्षी पाकिस्तानी हद्दीत शिरून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सोमवारी रात्री भारतीय लष्कराने सीमेपलीकडे जाऊन आणखी एक मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराच्या या कारवाईत तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून एक सैनिक जखमी झाला आहे. काश्मीरच्या केरी सेक्टरमध्ये शनिवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यावेळी पाकच्या गोळीबारात चार भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून यशस्वीपणे कारवाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास भारतीय लष्कराचे एक विशेष पथक पुंछ सेक्टरमधून सीमारेषेपलीकडे गेले. येथून भारतीय जवानांनी पाकच्या रावळकोट सेक्टरमधील रुख चकरी परिसरात प्रवेश केला व त्याठिकाणी गस्त घालत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. हे सैनिक ‘५९ बलूच रेजिमेंट’चे होते. याशिवाय, हल्ल्यात पाकिस्तानचे आणखी पाच जवानही जखमी झाले आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कारचे हे पहिलेच क्रॉस-बॉर्डर ऑपरेशन होते. आतापर्यंत पुढे आलेल्या अधिकृत माहितीनुसार, या हल्ल्यात पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झाले आहेत. मात्र, भारतीय लष्कराच्या दाव्यानुसार या हल्ल्यात पाकिस्तानची आणखी मोठी हानी झाली आहे. पाकिस्तानचे किमान सहा सैनिक या हल्ल्यात ठार झाल्याचा दावा गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनी केला आहे.

https://twitter.com/ANI/status/945490492719996928

तर दुसरीकडे जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्येही सध्या भारतीय सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. या दहशतवाद्याची ओळख पटली असून तो जैश ए मोहम्मदचा कमांडर नूर मोहम्मद असल्याचे सांगितले जात आहे. येथील सेम्पोरा परिसरात ही चकमक झाली. याठिकाणी काल रात्री भारतीय सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरले होते. त्यानंतर या चकमकीला सुरूवात झाली. ५० राजपूत रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या ११०व्या बटालियनकडून संयुक्तपणे ही कारवाई सुरू आहे. एक दहशतवादी अजूनही याठिकाणी लपून बसल्याची शक्यता असल्यामुळे सध्या लष्कराकडून सध्या संपूर्ण परिसर पिंजून काढला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army troops crossed over the line of control pok killed three pakistani army soldiers