Shubhshu Shukla Earth Return : आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात १८ दिवस राहिल्यानंतर आज (१५ जुलै) भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. ‘ॲक्सिओम-४’ या अंतराळ मोहिमेतील सदस्य १८ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहिले आहेत. त्यानंतर चारही अंतराळवीर अंतरराष्ट्रीय स्थानकामधून सोमवारी (१४ जुलै) भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.५० वाजता पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले होते.

त्यानंतर आज (१५ जुलै) शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीरांचं अंतराळयान कॅलिफोर्नियातील एका समुद्रात लँडिंग झालं आहे. हे चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. त्यानंतर आता या अंतराळवीरांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या सर्वांनी ही मोहीम यशस्वी पार पडल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

शुभांशू शुक्ला यांच्या आई-वडिलांना आनंद अश्रू

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात १८ दिवस राहिल्यानंतर आज भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. तसेच यावेळी शुभांशू शुक्ला यांच्या आई-वडिलांना आनंद अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं.

व्हिडीओ पाहा :

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, “ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला त्यांच्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेतून पृथ्वीवर परतत असताना त्यांचं मी स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून, त्यांनी त्यांच्या समर्पण, धैर्य आणि अग्रगण्य भावनेने अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली. हे आपल्या अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेने आणखी एक मैलाचा दगड आहे.”

अंतराळवीर मोहिमच्या समोरापावेळी शुक्ला झाले होते भावुक

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचा निरोप घेत असताना शुक्ला भावुक झालेले पाहायला मिळाले होते. “आपल्या समारोपाच्या भाषणात ते म्हणाले, अंतराळातून भारत खूपच चांगला दिसतो. अतिशय अविश्वसनीय असा हा प्रवास होता. “हा एक अविश्वसनीय प्रवास होता. या मोहिमेत सहभाग असलेल्या लोकांमुळे तो अद्भुत आणि अविश्वसनिय बनला,” असे शुक्ला त्यांच्या निरोपाच्या भाषणात म्हणाल होते.

तसेच शुभांशु शुक्ला त्यांच्या निरोपाच्या भाषणात पुढे हिंदीतून बोलताना म्हणाले की, “माझा हा प्रवास कमालीचा राहिला आहे. पण आता माझा हा प्रवास संपणार आहे, पण तुमचा आणि माझा प्रवास अजून खूप दूरपर्यंत आहे. आपला ह्यूमन स्पेस मिशनचा प्रवास खूप लांबचा आणि कठीण देखील आहे. पण मी तुम्हाला खात्री देतो की आपण जर निश्चय केला तर ती शक्य आहे.”

आजचा भारत अंतराळातून कसा दिसतो?

शुक्ला यांच्यापूर्वी अंतराळात गेलेले पहिले अंतराळविर राकेश शर्मा यांनी अंतराळातून भारत कसा दिसतो या प्रश्नाचे उत्तर देताना ‘सारे जहाँ से अच्छा’ असं उत्तर दिलं होतं. त्या ओळींना शुक्ला यांनी पुन्हा एकदा उजाळा दिला. शुक्ला म्हणाले की, “४१ वर्षांपूर्वी एक भारतीय अंतराळात गेले होते आणि त्यांनी आपल्याला सांगितले होते की वरून भारत कसा दिसतो. कुठेतरी आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं आहे की आज भारत कसा दिसतो, मी तुम्हाला सांगतो. आजचा भारत स्पेसमधून महत्वकांशी दिसतो, आजचा भारत निर्भीड दिसतो, आजचा भारत आत्मविश्वासाने भरलेला दिसतो, आजचा भारत अभिमानाने भरलेला दिसतो. याच सर्व कारणांमुळे मी पुन्हा एकदा म्हणू शकतो की आजचा भारत आजही ‘सारे जहाँ से अच्छा’ दिसतो. लवकरच जमिनीवर भेटू.”, असं त्यांनी अंतराळात गेल्यानंतर म्हटलं होतं.