US Illegal Immigrants: अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या स्थलांतरितांना परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज अमेरिकन लष्कराच्या ‘सी-१७’ या विमानातून १०४ भारतीय नागरिकांना पुन्हा पाठविले गेले. अमृतसरच्या श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरले. विमानात २५ महिला, १२ अल्पवयीन मुले आणि ७९ पुरुष होते. मंगळवारी दुपारी टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथून निघालेल्या या विमानात ११ क्रू मेंबर्स आणि ४५ अमेरिकन अधिकारी होते. मात्र विमानातील प्रवाशांचा साखळदंड बांधलेला एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल फोटो भारतीय नागरिकांचा असल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेसनेही या फोटोवरून भाजपावर टीका केली. मात्र आता या फोटोचे वास्तव समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल फोटोमध्ये काय दिसले?

भारतीय नागरिकांच्या नावाने एक फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये लष्करी विमानात बसलेल्या नागरिकांच्या हातात आणि पायात साखळी बांधलेली दिसत आहे. तसेच त्यांचा चेहरा मास्कमुळे झाकलेला दिसतो. दुसरा एक फोटो व्हायरल झाला, ज्यात प्रवाशांचे हाते मागे असून त्यांच्या हातात साखळी दिसत आहे. या फोटोवरून सोशल मीडियावर मोठा गजहब उडाला आहे. अनेकांनी यावरून मोदी सरकारवर टीका केली. “भारतीय नागरिकांना साखळदंडाने बांधून अमृतकाळात भारतात आणले. हे आधी कधीच पाहायला मिळाले नाही”, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.

आणखी एका युजरने म्हटले की, ट्रम्प प्रशासनाने भारतीय नागरिकांना पुन्हा मायदेशी धाडत असताना त्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागणकू दिली आहे. त्यांच्या हाता-पायांना साखळदंड बांधण्याची गरज होती का?

काँग्रेसचीही टीका

सामान्य नागरिकांप्रमाणे काँग्रेसलाही हा फोटो खरा वाटला. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी यावरून भाजपावर टीका केली. भारतीय नागरिकांना साखळदंड बांधल्याचे पाहून मला भारतीय या नात्याने दुःख वाटले, असे पवन खेरा म्हणाले. यानंतर त्यांनी २०१४ च्या पूर्वीचे काही प्रसंग उद्धृत करून त्यावेळी यूपीए सरकारने कशी कणखर भूमिका घेतली होती, याची माहिती दिली.

व्हायरल फोटो खरा?

व्हायरल होणारा फोटो भारतीय नागरिकांचा नसून ग्वाटेमलाच्या नागरिकांचा आहे. भारतीयांप्रमाणेच तिथल्या नागरिकांना ३० जानेवारी रोजी अमेरिकेच्या बाहेर काढले गेले. पाच दिवसांपूर्वी असोशिएटेड प्रेसने हा फोटो छापला होता. ज्यामध्ये अमेरिकन लष्कराच्या विमानात ग्वाटेमलाचे नागरिक बसलेले दिसत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indians deported from the us in handcuffs and chains truth behind viral pics kvg