IndiGo bans man for slapping co-passenger : मुंबई कोलकाता इंडिगो विमानात एका व्यक्तीने पॅनिक अटॅक आलेल्या दुसऱ्या एक सहप्रवाशाच्या कानशिलात मारल्याची घटना समोर आली होती. यानंतर या संबंधित व्यक्तीविपोधात विमान कंपनीने कठोर कारवाई केली असून त्याच्यावर बंदी घातली आहे. ही घटना फ्लाइट क्रमांक 6E 138 मध्ये घडली होती. विमान उतरल्यानंतर आरोपीला कोलकाता विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले होते. विमान कंपनीने शनिवारी या घटनेनंतर योग्य त्या चौकशीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई करण्यासाठी सूचित केल्याबद्दल सांगण्यात आले असल्याचे म्हटले होते.

विमान कंपनीने म्हटले आहे की, विमानांमधअये अशा बेशिस्त वर्तनाला मज्जाव करण्याबाब आम्ही वचनबद्ध आहोत. नियमानुसार, त्या व्यक्तीला इंडिगोच्या कोणत्याही विमानाने प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी किती दिवसांसाठी असेल याबद्दल मात्र माहिती मिळू शकलेली नाही. शुक्रवारी सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ समोर आळा होता. यामध्ये सीटवर बसलेल्या एका प्रवाशाने एका दुसऱ्या प्रवाशाला कानशिलात लगावली होती. यानंतर तो व्यक्ती रडू लागला. यावेळी मारणाऱ्या प्रवाशाला इतर सहप्रवासी थप्पड का मारली असा जाब विचारताना देखील व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

ही घटना उघकीस आल्यानंतर इंडिगोने एका अधिकृत निवेदनात प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये म्हटले आहे की, “आमच्या एका विमानात झालेल्या हल्ल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. असे बेशिस्त वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि आमच्या प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला आणि प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणाऱ्या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.”

“संबंधित हल्ला करणाऱ्या प्रवाशाला बेशिस्त घोषित करून विमानतळाच्या सुरक्षा पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रोटोकॉलनुसार, सर्व संबंधित नियामक संस्थांना याची माहिती देण्यात आली आहे. आमच्या सर्व विमानांमध्ये सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरण राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत”, असे निवेदनात पुढे म्हटले आहे.

कोण आहे पीडित?

या घटनेतील पीडित प्रवाशाचे नाव हुसेन अहमद मजुमदार असे आहे. मुंबईतील एका जिममध्ये काम करणारा हुसेन हा आसामच्या कछार जिल्ह्यातील काटीगोरा येथे घरी परतत असताना ही घटना घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून असे दिसून येते की त्यावेळी हुसेनला पॅनिक अ‍ॅटॅक आला असावा. सहप्रवाशांनी आणि एअरलाइनच्या क्रू मेंबर्सनी तात्काळ या हल्ल्याचा निषेध करत मारहाण करणाऱ्या प्रवाशाला सुनावले.