IPS Officer Siddharth Kaushal Resigns : भारतीय पोलीस सेवेत (IPS) तब्बल १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ कौशल यांनी अचानक राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पोलीस दलात एकच चर्चा रंगली आहे. सिद्धार्थ कौशल यांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला? त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी काही दबाव होता का? किंवा कामाचा वाढता तणाव म्हणून त्यांनी राजीनामा दिला का? राजीनामा देण्याचं आणखी काही वेगळं कारण आहे का? असे अनेक सवाल आता उपस्थित करण्यात येत आहेत.

आयपीएस सिद्धार्थ कौशल यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्यावरून सवाल उपस्थित केले. मात्र, यानंतर अखेर सिद्धार्थ कौशल यांनी राजीनामा देण्याचं कारण सांगत सविस्तर स्पष्टीकरण दिलं. आपण १३ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचं सिद्धार्थ कौशल यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

दरम्यान, सिद्धार्थ कौशल यांनी कामाचा तणाव किंवा छळ किंवा बाह्य दबाव या चर्चा चर्चा फेटाळून लावल्या आहेत. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं सिद्धार्थ कौशल यांनी सांगितलं आहे. तसेच कौशल हे २०१२ मध्ये भारतीय पोलीस सेवेत सामील झाले होते. त्यांनी महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) पदापर्यंत काम पाहिलेलं आहे. कौशल हे २०१२ मध्ये आयपीएस झाले आणि त्यानंतर त्यांनी कृष्णा आणि प्रकाशम जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक आणि अलिकडेच आंध्र प्रदेशात महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

सिद्धार्थ कौशल यांनी काय सांगितलं?

राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर स्पष्टीकरण देताना सिद्धार्थ कौशल यांनी सांगितलं की, “मी भारतीय पोलीस सेवेचा स्वेच्छेने राजीनामा देत आहे. हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक कारणास्तव आणि पूर्ण विचार केल्यानंतर घेतला आहे. माझ्या जीवनातील ध्येय आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेनुसार मी हा निर्णय घेतला आहे, असं सिद्धार्थ कौशल यांनी सांगितलं आहे.

“तसेच काही वृत्तांत माझ्या राजीनाम्याचा संबंध कथित छळ किंवा बाह्य दबावाशी जोडला जात आहे. मात्र, मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की असे दावे पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारे आहेत. माझा निर्णय पूर्णपणे स्वतंत्र, वैयक्तिक आणि ऐच्छिक आहे. तसेच भारतीय पोलीस दलात सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात परिपूर्ण आणि समृद्ध करणारा प्रवास होता. आता पुढे जात असताना मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात नवीन मार्गांनी समाजात योगदान देण्याचा प्रयत्न करेन”, असं सिद्धार्थ कौशल यांनी म्हटलं आहे.