वृत्तसंस्था, तेहरान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इराणमध्ये महिलांसाठी अनिवार्य असलेला हिजाब न घातल्याबद्दल अटक केलेल्या महसा अमिनीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर या देशात गेले दोन महिने हिंसक आंदोलन चिघळले होते. तिला इराणच्या ‘गश्त-ए-इर्शाद’ या नैतिकता संरक्षक पोलीस दलाने (मोरॅलिटी पोलीस) अटक केली होती. दोन महिन्यांत अनेक ठिकाणी निदर्शने होऊन पोलीस-आंदोलक मृत्युमुखी पडल्यानंतर इराणने हे नैतिकता संरक्षक पोलीस दल बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. इराणची अधिकृत वृत्तसंस्था इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सीने (इरना) हे वृत्त दिले आहे.

‘इरना’ने दिलेल्या वृत्तानुसार इराणचे प्रमुख सरकारी अधिवक्ते मोहम्मद जाफर मोंटाझेरी यांनी सांगितले, की नैतिकता संरक्षक पोलीस दल बरखास्त करण्यात आले आहे. त्यांनी याबाबत फारसा तपशील दिला नाही. त्यामुळे हे पोलीस दल कायमस्वरूपी बंद केले का? हे समजू शकले नाही.‘एपी’ने दिलेल्या वृत्तानुसार मोंटाझेरी यांनी सांगितले, की इराणची न्यायव्यवस्था मात्र सामुदायिक स्तरावर सार्वजनिक वर्तणुकीवर लक्ष ठेवणार आहे.इराणच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या प्रतिगामी धोरणांचा देशांतर्गत व्यापक निषेध होत असताना, तसेच हे आंदोलन चिरडण्यासाठी इराण सरकारने उचललेल्या आक्षेपार्ह पावलांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. नैतिकता संरक्षक पोलीस दलाची (गश्त-ए-इर्शाद किंवा रिव्होल्युशनरी गार्डस) स्थापना २००५ मध्ये करण्यात आली होती. देशाने अनिवार्य केलेल्या इस्लामिक वेशभूषेचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे प्रमुख कार्य या दलाला सोपवले होते. मात्र, या पोलीस दलाने महसा अमिनी या २२ वर्षीय कुर्दिश महिलेवर केलेल्या कारवाईत तिचा मृत्यू झाल्यानंतर सप्टेंबरपासून इराणमध्य देशव्यापी असंतोष उफाळला. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर देशासमोर उभे राहिलेले हे सर्वात मोठे आव्हान मानले जात होते. देशभरात हिंसक निदर्शने झाली. त्यांना जगभरातून पाठिंबा मिळाला. इराणच्या सरकारने अमिनीचा मृत्यू तिच्याशी गैरवर्तनातून झालेला नसल्याचे वारंवार ठासून सांगितले. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तिच्या शरीरावर जखमा, मारहाणीच्या खुणा दिसल्याचे सांगितले होते.

अनेक आंदोलकांचा मृत्यू
या आंदोलनात इराणमध्ये अनिवार्य हिजाबचा निषेध करण्यासाठी महिलांनी त्यांचे हिजाब जाळले होते. या आंदोलनास कलाकार-राष्ट्रीय खेळाडूंनीही पाठिंबा दिला. अनधिकृत अंदाजानुसार हे आंदोलन रोखण्यासाठी इराणच्या नैतिकता संरक्षक पोलीस दलाने केलेल्या प्रतिबंधक कारवाईत शेकडो आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. २९ नोव्हेंबर रोजी, इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने कबूल केले होते, की देशव्यापी आंदोलनात सुमारे तीनशेहून अधिक आंदोलक मारले गेले आहेत. गेल्या दोन महिन्यांत प्रथम यावर अधिकृत भाष्य करण्यात आले. इराणने आंदोलकांना दिलेल्या क्रूर वागणुकीमुळे जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांकडून इराणवर तीव्र टीका झाली. शुक्रवारी इराणचा समावेश अमेरिकेने चीन, रशिया आदी देशांसह धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या देशांत केल्याचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी जाहीर केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iran decision to disband police force after two months of violent protests against forced hijab amy