इराकी दहशतवाद्यांनी (इसिस)  गेल्या महिन्यात मोसूल शहरावर कब्जा केल्यानंतर या शहराच्या आसपास असलेल्या मशिदी आणि प्राचीन प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केल्याचा गौप्यस्फोट स्थानिक नागरिक आणि समाजमाध्यमांनी शनिवारी केला. ही घटना काहीशा विलंबाने उघडकीस आली असली तरी तिचे तीव्र पडसाद उमटण्याची दाट चिन्हे आहेत.
निनेवे प्रांतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर मोसूल शहराच्या आसपास  सुन्नी अरबांची चार पवित्र स्थळे तसेच शिया समुदायाच्या सहा मशिदी, दहशतवाद्यांनी (स्वत:स ‘जिहादी’ म्हणवून घेतात.) उद्ध्वस्त केल्याचे सांगण्यात आले.  
मोसूल शहर हे निनेवे प्रांताच्या राजधानीचे ठिकाण आहे. सुन्नी आणि सुफी पंथीयांची धर्मस्थळे बुलडोझरच्या सहाय्याने पाडण्यात आली तर शियांच्या मशिदी व प्रार्थनास्थळे बॉम्बमार्फत उद्ध्वस्त करण्यात आली. विशेष म्हणजे, ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया’ इसिस या संघटनेने या सर्व उद्ध्वस्त झालेल्या इमारतींची छायाचित्रे इंटरनेटवरही टाकली आहेत. प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करण्याबरोबरच दहशतवाद्यांनी दोन चर्चवरही कब्जा केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या चर्चवर दहशतवाद्यांनी ताबा घेतल्यानंतर तेथील दोन क्रॉस हटवून तेथे इस्लामी राजवटीचे प्रतीक असलेला काळा झेंडा फडकावला.
मोसूल शहराचे मानबिंदू असलेली ही सर्व प्रार्थनास्थळे तसेच मशिदी आमच्या वाडवडिलांनी, आजोबांनी उभारल्या होत्या. हे मानिबदू नष्ट झाल्याचा अत्यंत खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया अहमद या मोसूदमधील ५१ वर्षीय नागरिकाने व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isis destroys shrines shiite mosques in iraq