तेल अवीव्ह : इस्रायलने व्याप्त ‘वेस्ट बँक’ क्षेत्रात वसाहती स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे येथील भूभाग दोन भागांत विभागला जाणार आहे. पॅलेस्टाइन देशाच्या निर्मितीला त्यामुळे कायमचा हरताळ फासला जाणार आहे.

जेरुसलेमच्या पूर्व भागात वसाहती उभारण्याचे नियोजन दोन दशकांपासून इस्रायलच्या विचाराधीन आहे. मात्र, अमेरिकेच्या दबावामुळे ते साध्य होऊ शकले नाही. या वसाहती उभारण्यास इस्रायलने बुधवारी मंजुरी दिली. नियोजन आणि बांधकाम समितीने ही मंजुरी दिली. वसाहती उभारण्याची प्रक्रिया जलद गतीने झाली, तर येत्या काही महिन्यांतच बांधकामाला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी साडेतीन हजार अपार्टमेंट बांधण्यात येणार आहेत. यामुळे पॅलेस्टाइनच्या संकल्पनेला तडा जाईल, असे इस्रायलमधील मंत्री बिझालेल स्मॉटरिक यांनी सांगितले. या वसाहतींमुळे दक्षिण आणि उत्तर ‘वेस्ट बँक’ला जोडणारा दुवा संपणार आहे.

इस्रायलने १९६७पासून व्यापलेल्या ‘वेस्ट बँक’मध्ये सात लाख इस्रायली लोक राहतात.

गाझामध्ये मोठ्या कारवाईचे नियोजन

जेरुसलेम : इस्रायल गाझा शहरात मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पुढील काही दिवसांतच ही कारवाई केली जाईल. गाझाच्या लोकसंख्येने जास्त असलेल्या भागात कारवाईला संरक्षणमंत्र्यांनी मंजुरी दिल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराने दिली. त्यासाठी ६० हजार राखीव सैन्याचा वापर केला जाईल.