वृत्तसंस्था, तेल अविव

हमासने आपल्या सैनिकांवर गोळीबार केल्याचा दावा करत इस्रायलने रविवारी दक्षिण गाझामध्ये हमासच्या बंडखोरांना लक्ष्य केले. पॅलेस्टिनी गटाच्या सदस्यांनी रॉकेटसह ग्रेनेडचा (आरपीजी) वापर केला, त्यावर आम्ही हवाई हल्ले, तसेच तोफांचा वापर करून प्रत्युत्तर दिले, असे इस्रायली लष्कराने सांगितले. दरम्यान, कोणत्याही संघर्षांशी आपला संबंध नसल्याचे हमासने म्हटले आहे.

१० ऑक्टोबरच्या शस्त्रसंधी करारानुसार इस्रायलच्या ताब्यात असलेल्या भागामध्ये हमासने सैनिकांवर गोळीबार केला होता, असे इस्रायलचे म्हणणे आहे. हमासने सुटका केलेल्या दोन ओलिसांचे अवशेष आढळल्यानंतर इस्रायलने रात्री हे हल्ले केले. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सुरक्षा दलांशी चर्चा करत, शस्त्रसंधी उल्लंघनाविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु त्यांनी युद्ध पुन्हा सुरू करण्याची धमकी दिली नाही.  तणावाच्या 

पार्श्वभूमीवर पंतप्रधान नेतान्याहू यांनी शनिवारी गाझा आणि इजिप्तमधील रफाह सीमा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. रफाह सीमा पुन्हा उघडणे हे हमास सर्व २८ मृत ओलिसांचे अवशेष परत करते की नाही, यावर अवलंबून असेल, असे नेतान्याहू यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून लागू झालेल्या शस्त्रसंधी कराराचे इस्रायली सैन्याने ४७ वेळा उल्लंघन केले आहे, ज्यामुळे ३८ जणांचा मृत्यू आणि १४३ जण जखमी झाले आहेत, पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त ‘अल जझीरा’ने दिले आहे.