गाझामध्ये इस्रायल आणि हमासदरम्यान झालेल्या युद्धबंदी कराराला शुक्रवार दुपारपासून सुरुवात झाली असून त्यानुसार या भागातील इस्रायली सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केली, असे इस्रायली लष्कराने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदी प्रस्तावासह ओलीस ठेवलेले सैनिक आणि पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेला इस्रायली मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिल्यानंतर लष्कराने या कार्यवाहीला सुरुवात केल्याची माहिती या वेळी देण्यात आली. तत्पूर्वी पॅलेस्टिनने गाझाच्या अनेक भागांत शुक्रवारी सकाळी मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले झाल्याचा दावा केला.

इस्रायलने केलेल्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर मध्य गाझामधील वाडी गाझा येथे सकाळीच हजारोंच्या संख्येने नागरिक जमा झाले आणि त्यांनी उत्तरेच्या दिशेने पायी चालण्यास सुरुवात केली. – पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात मंत्रिमंडळाने ओलिसांच्या सुटेकसंदर्भातील करारातील निकष बाह्य स्वरूपात मान्य केल्याचे म्हटले आहे. मात्र आक्षेपार्ह बाबींबाबत कोणतीही प्रतिक्रिया यामध्ये देण्यात आलेली नाही. सैन्याची माघारी सुरू झाली असली तरी गाझातील ५० टक्के भागात नवीन ठिकाणी सैन्याचे नियंत्रण राहणार आहे, असे इस्रायली अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दुसऱ्या बाजूला युद्धबंदीची घोषणा होऊनही शुक्रवारी सकाळी नुसेरत येथे मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले झाल्याचे तेथील निर्वासित शिबिरातील नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे हे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक होते. इस्रायली सैन्याचे एक विमानही या भागातून कमी उंचीवर उड्डाण करत असल्याचेही निदर्शनास आले, असे युद्धात निर्वासित झालेल्या येथील नागरिकांनी सांगितले. उत्तर गाझातील काही नागरिकांच्या मते यामध्ये रणगाड्यांद्वारे बॉम्बहल्ल्यांचे जास्त प्रमाण होते. हल्ल्यांच्या घटनांमुळे लोक युद्धबंदीबाबत अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.

इस्रायली मंत्रिमंडळाने युद्धबंदी कराराला मंजुरी दिली, मात्र सैन्याकडून उत्तर आणि दक्षिण गाझामध्ये बॉम्बहल्ले सुरूच आहेत. -रामी महन्ना, व्यवस्थापकीय संचालक, शिफा हॉस्पिटल, गाझा

हमासने उल्लेख केलेले करारातील मुद्दे

दोन हजार पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका

मदतीसाठी इजिप्त सीमा पुन्हा खुली

इस्रायली तुरुंगात असलेल्या महिला, मुलांची सुटका

दोन हजार अमेरिकन सैनिकांची शांततेसाठी तैनाती