इस्रायल आणि पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमास यांच्यात मागच्या दहा दिवसांपासून युद्ध सुरु आहे. या युद्धात आत्तापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्या परिस्थितीबाबत आता इस्रायली लेखक आणि इतिहासकार युवाल हरारी यांचं एक महत्त्वाचं विधान समोर आलं आहे. आपल्या वक्तव्यातून त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध हे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या संघर्षाचं केंद्र ठरु शकतं. युक्रेनमध्येही संघर्ष सुरु आहे. अशात जर भौगोलिक तणाव वाढला तर जगात तिसरं महायुद्ध सुरु होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले युवाल हरारी?

करोना संकट सगळ्या जगाने सोसलं आहे. त्यानंतर युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष आणि आता इस्रायल आणि हमास यांच्या सुरु झालेलं युद्ध यामुळे जागतिक स्तरावर एक प्रकारची अस्थिरता निर्माण झाली आहे. हमासच्या युद्धात जर जास्त देश सहभागी झाले तर तिसरं महायुद्ध सुरु होऊ शकतं अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हरारी पुढे म्हणाले, “खरं तर अशी परिस्थिती तिथे निर्माण होते जिथे अराजक आहे. मागच्या पाच ते दहा वर्षांपासून जगात अनेक गोष्टी घडत आहेत. ज्याचे परिणाम आत्ता पाहण्यास मिळत आहेत. मात्र या सगळ्याचं एक कारण करोना महामारीही ठरली आहे. तसंच युक्रेन आणि रशियाचं युद्धही या अस्थिरतेला कारण आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात जे घडतं आहे ते जगातल्या अस्थिरतेचाच एक भाग आहे. हे लोण जर जगात पसरलं तर तिसरं महायुद्ध सुरु होऊ शकतं. कारण सध्या शस्त्रांच्या उपयोगांसह तंत्रज्ञान वापरलं जातं आहे. ज्यामुळे मानवी संहार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.”

हे पण वाचा- “हमासने शांतता प्रस्थापित होण्याचे सगळे मार्ग…..”, इस्रायली लेखक युवाल हरारी काय म्हणाले?

एका बाजूने या संघर्षाचा विचार करुन चालणार नाही

“इस्रायल-हमास प्रकरणाचा एका बाजूने विचार करुन चालणार नाही. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. सध्या निर्माण झालेली परिस्थिती का झाली आहे? याचाही विचार होणं आवश्यक आहे. इस्रायली असो किंवा पॅलेस्टाईनी हमासकडून माणुसकीचा विचार मुळीच केला जात नाही. इस्रायली असो किंवा पॅलेस्टाईनी ती माणसंच आहेत. मात्र शांतता प्रस्थापित होण्याच्या सगळ्या शक्यता हमासने संपवल्या आहेत. माणसाला किती वेदना होऊ शकतात याचा विचार हमासकडून मुळीच केला जात नाही.” असंही त्यांनी म्हटलं होतं.

७ ऑक्टोबरला पॅलेस्टाइनी संघटना हमासने गाझा पट्टीतून इस्रायलवर हल्ला केला. हमासने त्यावेळी साधारण ५ हजार रॉकेट चालवले होते. इस्रायली लोकांना त्यांच्या घरात घुसून ठार करण्यात आलं. अनेकांची घरं जाळली, माणसांना, स्त्रियांना ओलीस ठेवलं. इस्रायलने या हल्ल्याची तुलना अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्याशी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel palestine conflict could lead to third world war if israeli authors caution on gaza war scj