फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅपचा वापर भारतीय  पत्रकार, मानवी हक्क कार्यकर्ते व इतरांवर पाळत ठेवण्यासाठी केल्याचा आरोप करीत इस्रायलच्या ‘एनएसओ’ या तंत्रज्ञान समूहावर व्हॉट्सअ‍ॅपने खटला भरला आहे. हा सायबर हेरगिरीचा प्रकार असल्याचे व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे हेरगिरीचा हा प्रकार, लोकसभा निवडणुकीच्या काळात म्हणजे २० एप्रिल ते १० मे या दरम्यानच्या काळात झाल्याचं समोर आलं आहे.

कॅलिफोर्नियातील संघराज्य न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला असून त्यात असा दावा केला आहे, की एनएसओ समूहाने १,४०० यंत्रांमध्ये (मोबाइल) धोकादायक मालवेअर घुसवून संबंधित वापरकर्त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप उपयोजनांतील माहिती चोरली आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी सांगितले, की इस्रायली तंत्रज्ञान समूहाने काही मोबाइलधारकांची व्हॉट्सअ‍ॅप माहिती चोरून त्यांच्यावर पाळत ठेवली.

इस्रायली समूहाने हे आरोप फेटाळले असले तरी एकूण १०० मानवी हक्क कार्यकर्ते व पत्रकार यांच्यावर गेल्या मे महिन्यात सायबर हल्ले करण्यात आले. एनएसओने पीगॅसस नावाचे सॉफ्टवेअर तयार केले होते, त्याच्या मदतीने अँड्रॉइड, आयओएस, ब्लॅकबेरी ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या मोबाइलमधील व्हॉट्सअ‍ॅप व इतर माहिती चोरता येते. संबंधित तंत्रज्ञान समूहाने ‘उलट अभियांत्रिकी’ तंत्राचा वापर करून व्हॉट्सअ‍ॅपमधील सर्व खाचाखोचा जाणून घेतल्या व नंतर त्यातील माहिती चोरणारे सॉफ्टवेअर (आज्ञावली) तयार केले. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपची नक्कल करून काही हानिकारक मालवेअर संबंधित व्यक्तींच्या मोबाइलमध्ये समाविष्ट केले.

आणखी वाचा- Twitter वर राजकीय जाहिरातींना बंदी, CEO जॅक डॉर्सी यांनी केली घोषणा

पीगॅसस सॉफ्टवेअर

व्हॉट्सअ‍ॅपने मे महिन्यात वापरकर्त्यांना त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करण्यास सांगितले होते, कारण त्यामुळे हे दोष निघून जाणार होते. २० एप्रिल ते १० मे दरम्यान या तंत्रज्ञान गटाने मालवेअर सोडले. व्हॉट्सअ‍ॅपचे एकूण १.५ अब्ज वापरकर्ते आहेत. यात वापरकर्त्यांस व्हिडीओ कॉल येत असे व नंतर त्यातून मालवेअर व स्पायवेअर मोबाइलमध्ये सोडले जात असे. त्यामुळे कॉलला उत्तर देणेही वापरकर्त्यांस शक्य होत नसे. एनएसओ समूहाने संयुक्त अरब अमिरातीतील एका कार्यकर्त्यांवर पाळत ठेवण्यासाठी मदत केली होती, पीगॅसस हे सॉफ्टवेअर वापरकर्त्यांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडून सगळीच माहिती काढून घेते.