गुजरातमध्ये गायकांवर कार्यक्रमादरम्यान त्यांच्या चाहत्यांकडून उधळल्या जाणाऱ्या नोटांची उधळण काही नवी नाही. मात्र आता लंडनमध्ये गुजराती गायकांवर नोटांची उधळण झाली आहे. विशेष म्हणजे चाहत्यांनी त्यांच्या लाडक्या गायकांवर पाऊंड्सची उधळण केली आहे. किर्तीदान गढवी आणि मायाभाई अहिर यांच्या लंडनमधील कार्यक्रमात ‘पाऊंड्सचा पाऊस’ उपस्थितांना पाहायला मिळाला.

किर्तीदान गढवी आणि मायाभाई अहिर एका गाण्याच्या कार्यक्रमासाठी लंडनला गेले होते. या कार्यक्रमात त्यांनी डायरो (गुजराती संगीतातील एक प्रकार) सादर केला. लंडनमध्ये राहणाऱ्या गुजराती संगीत रसिकांना गढवी आणि अहिर यांचे सादरीकरण अतिशय आवडले. गायकांवर बेहद खूश झालेल्या उपस्थित रसिकांनी गढवी आणि अहिर यांच्यावर पाऊंड्सची बरसात केली. याआधी हजारो गुजराती लोकांनी विमानतळावर दोन्ही गायकांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती.

किर्तीदान गढवी आणि मायाभाई अहिर हे दोन्ही गायक अनेकदा वादात सापडले आहेत. मागील वर्षी गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील एका कार्यक्रमात या दोन्ही गायकांवर ४० लाखांची उधळण झाली होती. डिसेंबरमध्ये झालेल्या कार्यक्रमात नोटांचा पाऊस पडल्याने अनेकांचे डोळे विस्फारले होते. कारण त्यावेळी नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरात मोठा चलन तुटवडा निर्माण झाला होता.

नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर किर्तीदान गढवी यांच्यावर नोटांचा पाऊस झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या कार्यक्रमाचा व्हिडिओ त्यावेळी व्हायरल झाला होता. ‘नव्या नोटांसाठी लोक लांबच्या लांब रांगांमध्ये उभे आहेत आणि इथे पैशांचा पाऊस होतो आहे. नोटाबंदी लोकांना धर्मावर पैसे खर्च करण्यापासून रोखू शकत नाही,’ असे गढवी या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत होते. गुजरातमधील मुक्तेश्वर महादेव मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.