पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांच्या चकमकीत २० भारतीयांना हौतात्म्य आलं होतं. त्यानंतर सर्वच भारतीयांच्या मनात चीनविषयी तीव्र भावना आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर लडाखचे खासदार जमयांग नामग्याल यांनी चीनकडून अक्साई चीन परत घेण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं आहे. “२०२० मध्ये जे सरकार केंद्रात आहे ते १९६२ चं सरकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवतात. सर्जिकल स्ट्राईक करण्यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधानांनी पुन्हा तेच म्हटलं आहे. आता कोणती पावलं उचलायची आहेत हे यापूर्वीच सरकारनं ठरवलं आहे,” असंही नामग्याल म्हणाले.

यावेळी त्यांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारताच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसंच त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूतीही व्यक्त केली. जमयांग नामग्याल यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत या संपूर्ण घटनेवर भाष्य केलं. “भारत चीन सीमेवर जी परिस्थितीत आहे त्याची संपूर्ण देशाला कल्पना आहे. लडाखच्या नागरिकांच्या भावना पाहून ते आपल्या जवानांसोबत उभे असल्याचं मी सांगू शकतो. केंद्र सरकार जो कोणता निर्णय घेईल, लडाख त्यांच्या सोबत असेल,” असं जमयांग नामग्याल म्हणाले.

भारत चीन सीमेवरील तोडगा केवळ लडाखलाच नाही तर संपूर्ण देशाला हवा असल्याचंही त्यांनी नमूद केलं. “सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या कोणत्याही जवानाला काही होऊ नये अशी आमची आशा आहे. तसंच लडाखमध्ये राहणाऱ्या लोकांच्याही जिवनावर कोणता परिणाम होऊ नये असं वाटतं. या समस्येचं निराकरण एकदाच होऊन जावं अशी सर्वांची इच्छा आहे. चीननं एकदाच नाही तर अनेकदा भारताचा विश्वासघात केला आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तो चीनच्या ताब्यातील लडाख

यावेळी त्यांनी अक्साई चीनवरही भाष्य केलं. “या प्रदेशाला अक्साई चीन का म्हटलं जातं आणि त्याला चीनसोबत का जोडलं जातं. चीननं त्या प्रदेशावर अनधिकृतपणे ताबा मिळवला आहे. अक्साई चीनसारखं काही नाही. तो भारताचाच एक प्रदेश आहे ज्यावर चीननं ताबा मिळवला आहे. तो चीनच्या ताब्यात असलेला लडाखचा एक भाग आहे. यावर कायमचं भारतानं दावा केला पाहिजे. तो भारताचाच भूभाग आहे. तो प्रदेश परत मिळवणं कठिण आहे. परंतु अशक्य नक्कीच नाही,” असं जमयांग नामग्याल म्हणाले.