जपानमध्ये तीन वर्षांपूर्वी घडलेल्या फुकुशिमा अणुदुर्घटनेचा तिसरा स्मृतिदिन मंगळवारी काही क्षण शांतता ठेवून पाळण्यात आला.
त्सुनामी लाटा उसळून किनाऱ्यालगतच्या अणुप्रकल्पात घुसल्याने अणुभट्टय़ा वितळण्याची ही घटना घडली होती व त्यामुळे तेथील वातावरणात मोठय़ा प्रमाणात किरणोत्सर्जन झाले. त्सुनामी लाटांमुळे किनारी भागातील अनेकजण वाहून गेले होते. या अणुदुर्घटनेमुळे अणुऊर्जेच्या वापराचा फेरविचार करावा, अशी मागणी आज या दुर्घटनेच्या स्मृतिदिनी करण्यात आली. या घटनेत टोकियो व आसपासच्या शहरातील वाचलेल्या लोकांनी आयोजित केलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमास जपानचे सम्राट अकिहिटो व सम्राज्ञी मिशिको हे उपस्थित होते. स्थानिक प्रमाणवेळेनुसार २.४६ वाजता भोंगे वाजवण्यात आले व त्यानंतर काही क्षण देशभर शांतता पाळण्यात आली.
तीन वर्षांपूर्वी ९ रिश्टरच्या या भूकंपाने त्सुनामी लाटा उसळल्या होत्या. पाण्याच्या लाटा जेट विमानाच्या वेगाने येऊन किनाऱ्यावर आदळल्या होत्या. त्या फुकुशिमा अणुप्रकल्पात घुसल्याने स्फोट होऊन अणुभट्टी वितळली होती. आता ही अणुभट्टी पूर्ण बंद करण्याची प्रक्रिया काही दशके चालणार आहे.
या अणुभट्टीच्या दुर्घटनेमुळे अनेक लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन १० हजार लोक विस्थापित झाले होते. सम्राट अकिहिटो यांनी या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली व त्यानंतरच्या परिणामांना तोंड देणाऱ्या व्यक्तींना धीर दिला. अनेक लोक त्या उद्ध्वस्त भागात जीवन कंठत आहेत, तर काही तेथून बाहेर पडले आहेत असे त्यांनी  सांगितले.