गाझा पट्टीत इस्रायलच्या हल्ल्यात सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा विभागात ‘संरक्षण समन्वय अधिकारी’ म्हणून काम करणारे कर्नल वैभव अनिल काळे या माजी भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, यावरून आता ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. इस्रायलचा हल्ला निर्दयी असल्याचेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Vaibhav Kale: गाझा युद्धात वीरमरण आलेले वैभव काळे कोण होते?, मानवता जपणारा अधिकारी काळाच्या पडद्याआड

जावेद अख्तर यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत राग व्यक्त केला आहे. “रफाहमध्ये काम करणारे भारताचे निवृत्त कर्नल वैभव काळे यांचा रुग्णालयात जाताना मृत्यू झाला आहे. यावरून इस्रायलचे हल्ले किती निर्दयी आहेत, हे दिसून येते. या हल्ल्याबाबत इस्रायल कोणालाही उत्तरदायी नाही. इस्रायलने किमान भारताची माफी मागण्याचे सौजन्य दाखवायला हवे”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. पुढे बोलताना, कर्नल काळे यांच्या कुटुंबियांबाबत मी संवेदना व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.

महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इस्रायलने पॅलेस्टाईवर केलेल्या बॉम्ब हल्ल्याचाही जावेद अख्तर यांनी निषेध केला होता. “इस्रायल हिरोशिमा आणि नागासाकीचे उदाहरण देऊन गाझामधील निष्पाण नागरिकांवर बॉम्ब हल्ला करत आहे. मात्र, तथाकथित सुसंस्कृत देश केवळ बघायची भूमिका घेत आहेत. दुर्दैव म्हणजे हेच लोक आम्हाला मानवी हक्क शिकवतात.” अशी प्रतिक्रिया त्यांनी एक्स या समाज माध्यमावर दिली होती.

हेही वाचा – “…तर आज गोष्ट वेगळी असती,” जावेद अख्तर यांनी सांगितलं पहिलं लग्न मोडण्याचं कारण; हनी इराणींचा उल्लेख करत म्हणाले…

रुग्णालयात जाताना कर्नल वैभव काळे यांचा मृत्यू

दरम्यान, कर्नल काळे सोमवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह संयुक्त राष्ट्रांच्या वाहनाने रफाह येथील युरोपीय इस्पितळाकडे जात असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला होता. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. कर्नल वैभव काळे (४६) हे मूळचे नागपूरचे होते. भारतीय लष्करातून सन २०२२मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. दोनच महिन्यांपूर्वी ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात रुजू झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javed akhtar reaction on colonel vaibhav kale death in gaza spb