शिकागो : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या संभाव्य उमेदवार कमला हॅरिस या इतिहास घडवणाऱ्या अध्यक्ष होतील असा विश्वास अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी रात्री व्यक्त केला. डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशनन शिकागो येथे सुरू झाले. यावेळी लोकशाही कायम राखणण्यासाठी हॅरिस यांना मतदान करावे असे आवाहन बायडेन यांनी मतदारांना केले.
हेही वाचा >>> आमच्यामुळेच निर्णय रद्द!‘थेट भरती’वरून काँग्रेस अध्यक्षांचा दावा, ‘इंडिया’ नेत्यांची सरकारवर टीका
८१ वर्षीय बायडेन व्यासपीठावर आल्यानंतर पक्षाच्या हजारो सदस्य आणि नेत्यांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली. यावेळी वातावरण काहीसे भावनिक झाले होते. ५९ वर्षीय कमला हॅरिस याच अधिवेशनामध्ये गुरुवारी पक्षाची उमेदवारी अधिकृतपणे स्वीकारणार आहेत. माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांची मुख्य लढत होणार आहे. मतदान ५ नोव्हेंबरला होणार असून नवीन अध्यक्ष पुढील वर्षी जानेवारीमध्ये पदाची सूत्रे हाती घेईल. बायडेन म्हणाले की, हॅरिस यांना जगभरातील नेत्यांकडून आदर प्राप्त होईल. त्यांचा आपल्याला अभिमान वाटेल आणि त्या अमेरिकेच्या भविष्यावर आपला ठसा उमटवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ट्रम्प यांना २०२४मध्ये महिलांची शक्ती लक्षात येईल असा टोलाही त्यांनी लगावला.