सोमवारी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले होते. पाकिस्तानी सैनिकांनी या दोन्ही जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. या घटनेला २४ तास होत नाहीत तोच देशात राजकीय आरोपांच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्री असेल तरच पूर्णवेळ व्यूहरचना आखता येईल, असा टोला माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. जेव्हा २०१३ मध्ये पाकिस्तानने हेमराज या जवानाचे शिर कापले होते. तेव्हा सुषमा स्वराज यांनी या एका बलिदानाच्या बदल्यात १० शिर आणणार असे म्हटले होते. आता मी पंतप्रधानांना विचारतो की, ते आता या दोघांच्या बलिदानानंतर पाकचे किती शिर आणणार, असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.

मंगळवारी पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल यांनी देशाला आता पूर्णवेळ संरक्षण मंत्र्यांची गरज असल्याचे म्हटले. मनोहर पर्रिकर यांनी राजीनामा दिल्यापासून संरक्षण मंत्रिपदाचा भार अर्थमंत्री अरूण जेटलींकडे आहे. या वेळी त्यांनी २०१३ मध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यातील हुतात्मा हेमराज यांच्या घटनेची आठवण करून दिली. तसेच त्यावेळी भाजपने राजकारण केल्याचे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील पुँछ सेक्टरमधील कृष्णा घाटीत शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता. पाकच्या या हल्ल्यात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले होते. नायब सुभेदार परमजीत सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर हे या हल्ल्यात हुतात्मा झाले होते. हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. सोमवारी सकाळी ८.३० वाजल्यापासून पाकिस्तानचा गोळीबार सुरू होता. गोळीबार सुरू असतानाच पाक सैन्याने भारतीय जवानांच्या दिशेने रॉकेटचा माराही केला. यावेळी जखमी झालेल्या पाच जवानांपैकी दोन जवानांचा मृत्यू झाला. तर उर्वरित तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
गेल्या वर्षभरात पाकिस्तानने सीमारेषेवर २२८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. तर गेल्या महिन्यात सातवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले होते. गेल्या काही काळात केरनी सेक्टरमध्ये घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात सीमारेषेपलीकडे दहशतवाद्यांचे अनेक तळ असून ते सातत्याने या भागातून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असतात.