कर्नाटकचे सिंघम म्हणून ओळले जाणारे पोलीस उपायुक्त के. अन्नामलई यांनी पोलीस दलातून राजीनामा दिला आहे. समाजसेवा करण्यासाठी त्यांनी हा राजीनामा दिला आहे. के. अन्नामलई यांनी गृहमंत्री एम बी पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना आपण राजीनामा देत असल्याची माहिती दिली. के. अन्नामलई यांनी कर्तव्य बजावताना पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानिमित्त मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनीही के. अन्नामलई यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कुमारस्वामी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना के. अन्नामलई यांनी सांगितलं की, ‘मुख्यमंत्र्यांनी राज्याला तुमची गरज असल्याने निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. पण माझा निर्णय अंतिम झाला असल्याचं मी त्यांना सांगितलं. यानंतर त्यांनी मला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या’.

कोणत्याही राजकीय दबावातून आपण राजीनामा देत नसल्याचं के. अन्नामलई यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांचं कौतुकही केलं. कुमारस्वामी आणि माजी मुख्यमंत्री सिद्दरमय्या यांनी कर्तव्य बजावताना आपल्याला स्वातंत्र्य दिल्याचं सांगितलं.

‘संपूर्ण राज्यानेच मला खूप आदर दिला. मी अजून काही दिवस काम करु शकलो असतो. पण काही निर्णय घेणं गरजेचं असतं. मी सर्वांचे आभार मानतो’, अशी भावना त्यांनी व्यक्त केलं आहे. के. अन्नामलई आपल्या स्वच्छ प्रतिमा आणि धाडसीपणामुळे राज्यात चांगलेच प्रसिद्ध झाले होते. एसपी म्हणून काम करत असताना त्यांच्या बदलीविरोधात दोन जिल्ह्यात निदर्शनही झालं होतं.

राजीनाम्याच्या निर्णयावर बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘मी १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मला बाहेर पडून दुसरं काहीतरी करण्याची इच्छा आहे. सध्या मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. मला तीन ते चार महिन्यांचा वेळ लागेल. त्यानंतर निर्णय़ घेईन’. आपण राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

के. अन्नामलई २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून तामिळनाडूच्या करुर येथील रहिवासी आहेत. त्यांनी पोलीस सहाय्यक अधीक्षक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.