श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पत्रकार फहद शाह यांची शनिवारी शोपिआन न्यायालयाने जामिनावर सुटका केल्यानंतर काही तासांतच त्यांना श्रीनगर पोलिसांकडून अन्य एका प्रकरणात अटक करण्यात आली. श्रीनगर शहरात मे २०२० मध्ये झालेल्या चकमकीच्या वृत्तांकनासंदर्भात हे प्रकरण आहे.  

शोपिआन न्यायालयाने शाह यांची सुटका करण्याच्या आधी त्यांची विशेष न्यायालयाकडूनही सुटका झाली होती. आता त्यांना महिन्याभरातच तिसऱ्या वेळी अटक करण्यात आली आहे.  

३३ वर्षांचे शहा हे ऑनलाइन वृत्तमासिक काश्मीरवालाचे मुख्य संपादक आहेत. या मासिकाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, फहद शाह यांना जामीन मंजूर करताना न्यायदंडाधिकारी सय्यद कयूम म्हणाले की, रानटी समाजात जामीन मागणे खूपच कठीण आहे, पण सुसंस्कृत समाजात जामीन नाकारणे हे कठीण असते. जामीन मिळणे हा नियम आहे आणि तो नाकाराला जाणे हा अपवाद.  

शाह यांना प्रथम ४ फेब्रुवारी रोजी पुलवामा पोलिसांनी अटक केली होती. त्या प्रकरणात एनआयए कायद्याखाली विशेष न्यायालयाने त्यांना २२ दिवसांच्या कोठडीनंतर २६ फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर शोपिआन पोलिसांनी त्यांना अटक केली होती.  त्यांना शनिवारी जामीन मिळाला होता. 

जम्मू-काश्मीर पोलिसांनी म्हटले आहे की, फहद शाह हे दहशतवादाचे उदात्तीकरण, खोटय़ा बातम्या पसरविणे आणि नागरिकांना भडकावणे अशा तीन वेगवेगळय़ा प्रकरणांत पोलिसांना पाहिजे होते.