पीटीआय, मुंबई
“भारत आणि ब्रिटनदरम्यान मुक्त व्यापार करारामुळे अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत,” असे मत ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी बुधवारी व्यक्त केले. स्टार्मर यांचा भारत दौरा बुधवारपासून सुरू झाला. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ते पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. स्टार्मर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या भेट होणार असून त्यामध्ये व्यापारासह विविध मुद्द्यांवर चर्चा होईल.

भारत २०२८पर्यंत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार असून, व्यापार करारामुळे वाढीला चालना मिळणार आहे, असा विश्वास स्टार्मर यांनी व्यक्त केला. स्टार्मर यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये त्यांच्याबरोबर १२५ सदस्यांचे शिष्टमंडळही आले आहे. त्यामध्ये ब्रिटनमधील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक, उद्योजक आणि विद्यापीठांचे कुलगुरू यांचा समावेश आहे. रोल्स रॉइस, ब्रिटिश टेलिकॉम, डायजियो, लंडन स्टॉक एक्सचेंज आणि ब्रिटिश एअरवेज यांचे महत्त्वाचे अधिकारी शिष्टमंडळाबरोबर भारतात आले आहेत.

भारतातील विकासामुळे ब्रिटिश जनतेसाठी अधिक संधी, स्थैर्य आणि नोकऱ्या मिळणार आहेत, असे स्टार्मर म्हणाले.

आम्ही जुलैमध्ये भारताबरोबर महत्त्वाचा व्यापार करार केला. कोणत्याही देशाबरोबरचा हा सर्वोत्तम करार आहे. हा करार केवळ कागदापुरता नाही, तो वाढीसाठी चालना आहे. भारत २०२८मध्ये तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल आणि त्यांच्याबरोबर व्यापार केल्यामुळे स्वस्तात आणि जलद वस्तू मिळतील. यातून अतुलनीय संधी उपलब्ध होणार आहेत. – कीर स्टार्मर, पंतप्रधान, ब्रिटन

‘वायआरएफ’ स्टुडिओला भेट

कीर स्टार्मर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे स्थान असणाऱ्या ‘यशराज फिल्म्स’ (वायआरएफ) स्टुडिओला बुधवारी भेट देली. ‘वायआरएफ’सह भारतातील मोठ्या चित्रपट निर्मात्या कंपन्या ब्रिटनमध्ये विविध ठिकाणी चित्रपट निर्मिती करतील अशी घोषणा स्टार्मर यांनी यावेळी केली. त्यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात ‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट’, ‘ब्रिटिश फिल्म कमिशन’, ‘पाइनवूड फिल्म्स’, ‘एल्स्ट्री स्टुडिओज’ आणि ‘सिव्हिक स्टुडिओज’ यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. स्टार्मर यांनी ‘वायआरएफ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय विधवानी, अभिनेत्री राणी मुखर्जी, ‘एक्सेल एंटरटेन्मेंट’चे रितेश सिधवानी आणि ‘धर्मा प्रॉडक्शन’चे अपूर्व मेहता यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फुटबॉल प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन

स्टार्मर यांच्यासाठी इंग्लिश प्रीमियर लीगने मुंबईत फुटबॉलचा प्रदर्शनीय सामना आयोजित केला होता. त्यामध्ये त्यांनी उत्साहाने भाग घेतला. यासाठी स्टार्मर कडक सुरक्षा व्यवस्थेत दक्षिण मुंबईतील कूपरगेज फुटबॉल मैदानात पोहोचले. दोन्ही देशांदरम्यान क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून मुत्सद्देगिरी वाढवण्यासाठी आणि संबंध मजबूत करण्यासाठी हा सामना आयोजित करण्यात आला होता.