Brain-Eating Amoeba : केरळमध्ये ‘मेंदू खाणाऱ्या अमीबा’चा कहर पाहायला मिळत आहे. या मेंदू खाणाऱ्या अमीबाच्या संसर्गामुळे आतापर्यंत केरळमध्ये तब्बल १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या संसर्गाच्या अनुषंगाने आता केरळच्या आरोग्य विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मेंदू खाणारा अमीबा अर्थात नेग्लेरिया फॉवलेरी नावाच्या अमीबाच्या हल्ल्यामुळे प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस हा संसर्ग होतो.

या संसर्गाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी याची दखल घेत आढावा घेतला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी म्हटलं की, “केरळ गंभीर आरोग्य आव्हानाचा सामना करत आहे. याआधी कोझिकोड आणि मलप्पुरम सारख्या जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या क्लस्टर्सशी संबंधित संसर्ग नोंदवण्यात आला होता. मात्र, आता संपूर्ण राज्यभरात अनेक प्रकरणे समोर आले आहेत. या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये ३ महिन्यांच्या बाळापासून ते ९१ वर्षांच्या व्यक्तीपर्यंतच्या रुग्णांचा समावेश आहे.” या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

मेंदू खाणाऱ्या अमीबाच्या संसर्गाची लक्षणे काय?

हा संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात डोकेदुखी, ताप, मळमळ व उलट्या, अशी लक्षणे दिसून येतात. तसेच मान ताठ होणे, फिट येणे, गोंधळ उडणे, भास होणे यांचा समावेश असू शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये संक्रमित व्यक्ती कोमात जाऊ शकते आणि मृत्यू होऊ शकतो. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनने (CDC) दिलेल्या माहितीनुसार, PAM चा संसर्ग झालेले बहुतांश रुग्ण लक्षणे सुरू झाल्यापासून एक ते अठरा दिवसांत मृत्युमुखी पडतात. सहसा पहिले पाच दिवस कोमा आणि नंतर मृत्यू होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

‘प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस’ म्हणजे काय?

मेंदू खाणारा अमीबा अर्थात नेग्लेरिया फॉवलेरी नावाच्या अमीबाच्या हल्ल्यामुळे प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस (Primary amebic meningoencephalitis – PAM) हा संसर्ग होतो. हा मेंदूच्या संसर्गाचा दुर्मीळ आजार आहे. नेग्लेरिया फॉवलेरी हा एकपेशीय सजीव असून, तो डोळ्यांना दिसत नाही. सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे अस्तित्व दिसून येऊ शकते. हा अमीबा जगभरात कुठेही तलाव, नद्या, जलतरण तलाव, गरम पाण्याचे झरे यांसारख्या गोड्या पाण्यात, तसेच मातीमध्येही आढळतो. तो शरीरात फक्त नाकावाटे प्रवेश करून मेंदूपर्यंत जाऊ शकतो. ११५°F (४६°C)पर्यंतचे उच्च तापमान त्याच्या वाढीसाठी अनुकूल असते. तो उबदार वातावरणात अल्प काळ टिकू शकतो. खराब नद्यांमध्ये अथवा जलतरण तलावाची अवस्था आणि देखभाल खराब असेल, तर तिथे हा अमीबा आढळू शकतो.