Hijab Controversy : केरळच्या कोचीमधील एका खासगी शाळेत हिजाबवरून वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. एक विद्यार्थिनी शाळेत हिजाब परिधान करून आल्यानंतर हा वाद वाढल्याने शाळेत मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे शाळेत तणाव निर्माण झाल्यानंतर संबंधित शाळेने १३ आणि १४ ऑक्टोबर अशी दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून न्यायालयाने या शाळेला पोलीस तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकं काय घडलं?

कोची येथील सीबीएसईशी संलग्न असलेल्या एका शाळेत हिजाब घालण्याच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला आहे. कोची येथील पल्लुरुथी परिसरातील एका शाळेत शुक्रवारी काही लोक घुसले आणि त्यांनी हिजाब घालण्याची परवानगी देण्याची मागणी शाळेकडे केली. मात्र, संबंधित शाळा आणि पालक व शिक्षक संघटनेने ही मागणी शाळेच्या ड्रेस कोडच्या विरुद्ध असल्याचं म्हटलं.

त्यानंतर शाळा प्रशासनाने या संदर्भात सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि शाळेला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. शाळेच्या संरक्षण देण्याच्या मागणीनंतर केरळ उच्च न्यायालयाने पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, संबंधित शाळेचे अध्यक्ष जोशी कैथवलप्पिल यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “जूनमध्ये शाळेत प्रवेशाच्या वेळी आम्ही स्पष्टपणे गणवेशाचा उल्लेख केला होता. त्यासाठी मुलींच्या पालकांनीही सहमती दर्शवली होती. ४५० विद्यार्थ्यांपैकी ११७ मुस्लिम विद्यार्थींनी आहेत. मात्र, यापैकी फक्त एक विद्यार्थीनी शाळेच्या गणवेशाला आव्हान देऊ इच्छित आहे. मात्र, शाळा या मागणीच्या पूर्णपणे विरोधात आहे. या मागणीच्या मागे नेमकं संबंधितांची भूमिका वेगळी असल्याचा आम्हाला संशय आहे. तसेच यावरून शाळेत येऊन निषेध व्यक्त करणारे लोक हे स्थानिक नाहीत”, असं त्यांनी म्हटलं.

शाळेच्या मुख्याध्यापिका काय म्हणाल्या?

“आम्ही संबंधित मुलीला आणि तिच्या पालकांना शाळेच्या गणवेशाबाबत स्पष्टपणे माहिती दिली होती. शाळा १९९८ पासून कार्यरत आहे. शाळेत अशी समस्या पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे. पालक आणि काही लोक शुक्रवारी शाळेच्या परिसरात आले आणि त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी तणावात असल्यामुळे आम्ही दोन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.”

मुलीच्या वडिलांनी काय म्हटलं?

“मुलीला हिजाब घालण्याचा अधिकार मिळावा, यासाठी आम्ही तीन-चार वेळा शाळेशी संपर्क साधला होता. जर माझी मुलगी हिजाब घालते तर तिला परवानगी दिली पाहिजे”, असं मुलीच्या वडिलांनी म्हटलं आहे.

केरळ सरकारने दिले चौकशीचे आदेश

केरळचे शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटलं की, “शिक्षण अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्याचे आदेश दिले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश पाळावा लागेल. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये.”