Ebrahim Raisi Death : इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रईसी हे अजरबैजानमधून परतत होते. त्याचवेळी त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. १७ तास उलटल्यानंतर हे हेलिकॉप्टर शोध आणि बचाव पथकाला सापडलं आहे. त्यांचं हेलिकॉप्टर पूर्णपणे जळून खाक झालं आहे. अपघाताचे फोटोही समोर आले आहेत. या अपघातात रईसी यांच्याबरोबर प्रवास करणारी कोणतीही व्यक्ती बचावलेली नाही. हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. रईसी यांच्यासह इतरांचा शोध घेतला जात होता. मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ANI या वृत्तसंस्थेने या वृत्ताची पुष्टी केली आहे. या अपघातात इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीराब्दुल्लाहियन, पूर्व अजरबैजान प्रांताचे राज्यपाल, इतर अधिकारी, रईसी यांचे अंगरक्षक आणि पायलटचा मृत्यू झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अल-जजीराच्या अहवालानुसार रईसी हे अमेरिकन बनावटीच्या बेल २१२ या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते. बेल टेक्स्ट्रॉन इंकने या हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. ही एक अमेरिकन एअरोस्पेस कंपनी आहे. कंपनीचं मुख्यालय टेक्सासच्या फोर्ट वर्थमध्ये आहे. एकूण १५ प्रवासी क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरमधून एकूण ९ जण प्रवास करत होते. वायूदलासह व्यावसायिक आणि प्रवासी वाहतुकीसाठीदेखील या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.

बेल २१२ हे एक मध्यम आकाराचं दोन इंजिन असलेलं हेलिकॉप्टरआहे. पायलटव्यतिरिक्त या हेलिकॉप्टरमधून एकूण १४ प्रवासी प्रवास करू शकतात. सर्वात आधी १९६० मध्ये या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली होती. कालांतराने या हेलिकॉप्टरमध्ये अनेक नवनवे तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. हे एक अत्याधुनिक हेलिकॉप्टर मानलं जातं. १९९७ मध्ये बेल २१२ या हेलिकॉप्टरच्या अपघाताची पहिली घटना समोर आली होती. ल्युसियानाच्या समुद्रकिनाऱ्यावर हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. त्या अपघातात आठ जणांचा बळी गेला होता. २००९ मध्ये कॅनडात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. त्या अपघातात १७ जण मृत्यूमुखी पडले होते. हे एक सुरक्षित हेलिकॉप्टर मानलं जातं. त्यामुळे जगभरातील अनेक नेते याचा वापर करतात.

हे ही वाचा >> Ebrahim Raisi Helicopter Crash: इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, देशावर शोककळा

इब्राहिम रईसींचा अल्प परिचय

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा जन्म १९६० मध्ये इराणच्या मशहद शहरात झाला. त्यांचे वडील मौलवी होते. रईसी पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं अकाली निधन झालं. धर्म आणि राजकारण हे त्यांचे आवडते विषय आहेत. महाविद्यालयीन आयुष्यापासूनच त्यांनी विविध आंदोलनांमध्ये आणि विविध चळवळींमध्ये सहभाग घेतला. इब्राहिम रईसींनी इराणच्या न्यायव्यवस्थेतही काम केलं आहे. सत्तेवर आल्यावर त्यांनी अनेक वादग्रस्त निर्णयही त्यांनी घेतले आहेत. १९८८ मध्ये इराणच्या कैद्यांना सामूहिक फाशी देण्यात आली. या निर्णय प्रक्रियेत रईसींचाही सहभाग होता. त्यावेळी इराणमध्ये तब्बल ५,००० हून अधिक कैद्यांना फाशी देण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know abourt iran president ebrahim raisi crashed helicopter made in usa asc