‘कदम्बश्री’ या केरळमधील दारिद्रय़ निमूर्लन मोहिमेद्वारे आता दृक्माध्यम सुरू करण्यात येणार आहे. कदम्बश्रीच्या वतीने केवळ महिलांसाठी नवी दूरचित्रवाणी वाहिनी सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे तळागाळातील महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या मोहिमेची सुरुवात म्हणून कदम्बश्रीच्या वतीने निवडक सदस्यांना  दृक्माध्यमातील सर्व प्रकारचे म्हणजे वार्ताकन, संपादन, संहितालेखन, कॅमेरा हाताळणे आणि निर्मितीपूर्व आणि निर्मितीनंतरचे काम यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
केवळ महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या वाहिनीमुळे दृक्माध्यम हे केवळ उच्चशिक्षित आणि पात्र व्यक्तींसाठीच असल्याचा समज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दृक्माध्यमात महिलांचा अधिकाधिक समावेश व्हावा यासाठी प्रस्तावित वाहिनी प्रयत्नशील राहणार आहे, असे कदम्बश्रीच्या कार्यकारी संचालिका के. बी. वल्सलाकुमारी यांनी सांगितले.
सदर वाहिनी सुरू करण्याचा दिवस आम्ही अद्याप जाहीर केलेला नाही. मात्र महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यास प्राधान्य देणारी वाहिनी सुरू करण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत, असे वल्सलाकुमारी म्हणाल्या. दृक्माध्यमात अनेक महिला काम करीत आहेत, परंतु त्या वृत्तनिवेदिका अथवा वार्ताहर आहेत. मात्र वाहिन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी आहे, असेही त्या म्हणाल्या.