पीटीआय, पॅरिस

नेपाळमध्ये सरकारविरोधात तरुणांनी जनआंदोलन केल्यानंतर फ्रान्समध्येही सरकारविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरत मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. पॅरिसमध्ये बुधवारी आंदोलकांनी रस्ते अडवून जाळपोळ केली. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांनी निवडलेल्या नव्या पंतप्रधानांना आंदोलकांनी तीव्र विरोध केला. आंदोलन करणाऱ्या २५० जणांना अटक करण्यात आल्याचे गृह विभागाने सांगितले.

फ्रान्सचे पंतप्रधान फ्राँस्वा बायरो यांचा विश्वासदर्शक ठरावात पराभव झाल्यानंतर अध्यक्ष माक्राँ यांनी सेबॅस्टिन लेकोर्नू यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. मात्र नागरिकांचा लेकोर्नू यांना विरोध असून माक्राँ यांच्याविरोधात रोष निर्माण झाला आहे. त्याशिवाय अर्थसंकल्पात कपात आणि इतर तक्रारींविरोधात बुधवारी ‘ब्लॉक एव्हरिथिंग’ या गटाच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलन करण्यात आले. त्यामुळे ८० हजार पोलीस तैनात करावे लागले.

रेनेस शहरात एका बसला आग लावण्यात आली. वीजवाहिनींना मोठ्या प्रमाणात आगी लावण्यात आल्याने रेल्वे सेवा थांबल्या, असे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. आंदोलकांच्या गटांनी पॅरिसचा बेल्टवे वारंवार रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला.